पाली विभागाचा बहुआयामी उपक्रम; प्रदर्शन, मिरवणूक, कार्यशाळा व संगीत कार्यक्रमांनी साधली सांस्कृतिक-आध्यात्मिक सांगड
मुंबई, दि. ४ मे: मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागातर्फे दिनांक ३० एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत वेसाक (बुद्ध पौर्णिमा) उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. भगवान गौतम बुद्ध यांच्या ज्ञानप्राप्तीच्या २६१५ व्या वर्षानिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या या उत्सवाला विद्यार्थी, संशोधक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३० एप्रिल रोजी उद्घाटनाने या उत्सवाची सुरुवात झाली. “एहि-पस्सिको” या गंधार कलेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनासह “धम्मकलायतन” या बौद्ध प्रतीके व जातक कथांवरील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बुद्धांच्या जीवनाशी संबंधित विविध कलात्मक पैलू सविस्तरपणे उपस्थितांसमोर उलगडले.
१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध धातू व अर्हंतांच्या अवशेषांची भव्य मिरवणूक विद्यापीठ परिसरात काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण प्राप्त करून दिले. त्यानंतर विपश्यना ध्यान आणि धातुपूजा करण्यात आली. पाली विभाग प्रमुख डॉ. योजना भगत यांनी “बुद्धांच्या अवशेषांवर” विशेष व्याख्यान दिले, तर सायंकाळी धम्मचक्कपवत्तन सुत्ताचे पठण व दीपप्रज्वलन करण्यात आले. २ मे रोजी “गांधारी भाषा व खरोष्ठी लिपी” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संघदान, बोधी पूजेसह मिरवणूक, बौध्द परंपरेतील २८ बुद्धांची पूजा व सुत्त पठण पार पडले. ३ मे रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित ‘द बुद्ध अँड हिज धम्म’: पाली टिपिटकाच्या प्रकाशात” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप प्रसंगी “मेलडी ऑफ द मिडल पाथ” या धम्मपदावर आधारित संगीत कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. डॉ. संजय मोहोड व त्यांच्या पथकाच्या सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.उत्सवाच्या निमित्ताने प्रतीक्षा कांबळे यांनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन पाली विभाग प्रमुख डॉ. योजना भगत यांनी प्रभावीपणे केली. विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा वेसाक उत्सव यशस्वीपणे पार पडला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक प्राध्यापक लक्ष्मण सोनावणे यांनी केले. या उत्सवाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणींचा प्रसार, पाली साहित्याविषयी जागरूकता आणि सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची जपणूक करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.





