नीलकमल स्मृती फाऊंडेशनचा उपक्रम
सडक अर्जुनी-नीलकमल स्मृती फाऊंडेशन सडक अर्जुनीच्या वतीने बकी/ मेंडकी येथील रहिवासी तथा चिखली येथील रत्नदीप विद्यालयाची माजी गुणवंत विद्यार्थिनी कु.छन्नु नरेश चुटेची नुकतीच पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.यावेळी चिखली येथील रत्नदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एम. पातोडे, नीलकमल स्मृती फाऊंडेशनचे आयोजक तथा सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम तसेच छन्नु चुटे चे आई- वडील, आजी- आजोबा उपस्थित होते.
छन्नु चुटे हिने मनात जिद्द चिकाटी, कठोर मेहनत व आत्मविश्वास बाळगून तसेच आईवडिलांच्या परिस्थितीचे भान ठेवून पाहिल्याच प्रयत्नात तिची पोलीस दलात निवड झाली. त्याबद्दल नीलकमल स्मृती फाऊंडेशनच्या वतीने शाल, संविधान पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उल्लेखनीय म्हणजे, तिची जानेवारी 2026 मध्ये सीमा सुरक्षा दलात निवड झाली होती.परंतु, तिने ती नोकरी नाकारली. आता पुन्हा एप्रिल 2026 मध्ये गोंदिया पोलीस दलात निवड झाली आहे.
ती चिखली येथील रत्नदीप विद्यालयातून 2018 मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झाली. इयत्ता बारावी चे शिक्षण सडक अर्जुनी
येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून घेतले. ती बी.ए. बी.कॉम पदवीधारक असून तिने महाविद्यालयात एनसीसी चे शिक्षण घेतले. साकोली व भंडारायेथील वाचनालयात परीक्षेची तयारी केली. त्या चारही बहिणीच असून एकीची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल कुटुंबात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे.तिचे नीलकमल फाऊंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम, आयोजिका प्रज्ञा मेश्राम, रत्नदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एम. पातोडे व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





