– उपविभागीय अधिकाऱ्यांसह नायब तहसीलदार यांना दिली घटनेची माहिती
– तत्काळ प्रभावाने सुरू होणार मदतीचा पंचनामा
गोंदिया- मागील दोन दिवसांपासून गोंदिया, गोरेगाव सह तिरोडा भागातील गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला असून अनेकांची घराची छप्परे उडाली असून धानपिकासह आंबापिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच 8 मे रोजी आलेल्या चक्रीवादळानंतर जिल्हा परिषद संजय टेंभरे यांनी रापेवाडा येथे भेट देवून तात्काळ उपविभागीय अधिकाऱ्यांसह इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती देवून तत्काळ नुकसानीचा पंचनामा करून मदत करण्याच्या सूचना दिल्या.
मागील दोन दिवसांपासून गोंदियासह गोरेगांव व तिरोडा भागातील गावाना चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने लाखोंचे नुकसान झालेले आहे. अशातच 8 मे रोजी सायंकाळ दरम्यान जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे हे क्षेत्रात भेटी दरम्यान रापेवाडा येथे उपस्थित असताना अचानक चक्रीवादळ आले. यात अनेकांची घराची छप्परे उडाली. शेतातील धानाचे व आंबापिकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. विद्युत खांब उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. लगेच जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार व तलाठी यांना घटनेबाबद अवगत करून पंचनामा करण्याची मागणी केली. त्यामुळे रापेवाडा परिसरातील नुकसानीचे आज 9 मे पासून पंचनामा करण्यास सुरुवात होणार आहे. नुकसानीचे पंचनामा करून केवळ औपचारिकता न करता नुकसानग्रस्तांना ठोस मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी वरिष्ठाना केलेली आहे.





