गोंदिया : शहरात प्रथमच अखिल भारतीय किन्नर महासंमेलनाचे आयोजन शुक्रवारी (दि. २४) करण्यात आले होते. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या हजारहून अधिक किन्नरांच्या उपस्थितीने शहर रंगून गेले. किन्नर आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर तथा प्रसिद्ध समाजसेविका माँ लक्ष्मी त्रिपाठी यांच्या उपस्थितीमुळे या महासंमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
महासंमेलनानिमित्त सकाळी पोवार बोर्डिंग येथून शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर आणि नृत्याच्या तालावर किन्नर समाजाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत माँ लक्ष्मी त्रिपाठी स्वतः सहभागी झाल्या होत्या. रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत असताना नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. रॅलीदरम्यान किन्नर समाजाने शहरातील दुर्गा मंदिर आणि भवानी मंदिरात दर्शन घेऊन घंटा तसेच रोख रक्कम दान केली. त्यानंतर यादव चौक परिसरातील महाकालेश्वर मंदिरातही दर्शन घेत समाजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. धार्मिक स्थळांवर जाऊन केलेल्या या पूजनातून समाजात शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. या महासंमेलनाचे आयोजन गोंदियातील किन्नर समाजाच्या अध्यक्ष निशा नायक यांच्या पुढाकारातून करण्यात आले. महामंडलेश्वर माँ लक्ष्मी त्रिपाठी यांनी यावेळी समाजात समानता, सर्वधर्मसमभाव आणि मानवतेची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. किन्नर समाज हा समाजाचा अविभाज्य घटक असून, त्यांच्याकडे आदर आणि सन्मानाने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि सन्मान मिळाला पाहिजे, हा संदेशही त्यांनी दिला.
त्यांनी दिला सामाजिक ऐक्याचा संदेश
देशाच्या विविध भागातील किन्नर समाजाला एकत्र आणत त्यांनी सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश दिला. या संमेलनात दिल्ली, मुंबई, पुणे, पंजाब, हैदराबाद, गुजरात, कोलकाता, भोपाल, आग्रा आदी शहरांमधून आलेल्या किन्नरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.





