29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या विरोधात गडचिरोलीत आंदोलन

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या विरोधात गडचिरोलीत आंदोलन

0
4

गडचिरोली : नीट पेपरफुटीप्रकरणी राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्यानंतर त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहे. गडचिरोलीत विविध संघटना आणि पक्षांकडून निदर्शने, धरणे, मोर्चा, रास्ता रोको आणि गुरूवारी गडचिरोली बंदचीही हाक देण्यात आली होती. आता हे लोण तालुका मुख्यालये आणि मोठ्या गावांपर्यंत पोहोचले आहे. आरमोरी, देसाईगंज, अहेरी, आलापल्ली, आष्टीत विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी निषेध आंदोलन केले. आज देसाईगंज येथे रास्ता रोको केला जाणार आहे.

गडचिरोलीत आयोजित बंदला दुपारपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरातील शाळा-महाविद्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात धरणे देण्यात आले. यादरम्यान विद्यार्थी प्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सरकारचा निषेध करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

यावेळी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे, बाळू टेंभुर्णे, जी.के. बारसिंगे, शेतकरी कामगार पक्षाचे रामदास जराते, जयश्री जराते, आझाद समाज पक्षाचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, सोनाशी लभाने, शिवसेनेचे पवन गेडाम, रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, हंसराज उंदीरवाडे, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे देवराव चवळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे मिलिंद बांबोळे, माकपचे डॉ.धर्मराज सोरदे , टायगर सेनेचे चंद्रशाह उईके तसेच सामाजिक कार्यकर्ता गौतम मेश्राम, विलास निंबोरकर, सुरज पिपरे, चंद्रकांत भोयर, प्रतिक डांगे, प्रितेश अंबादे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सहभागी शिक्षकांवर पोलिसांचा दबाव?

या आंदोलनादरम्यान पोलिसांनी जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही विद्यार्थी आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवत असताना संबंधित विद्यार्थ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनी करून दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय काही शिक्षकांनी शाळेला सुटी दिल्यानंतर पालक म्हणून आंदोलनात सहभाग घेतला असता, त्यांच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याचे आझाद पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. पण आम्ही कोणत्याही पक्षाचे बॅनर घेऊन नाही तर संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलनात सहभागी झाल्याचे त्या शिक्षकांनी पोलिसांना सांगितले. या प्रकाराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

blank