27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ रामगड ग्रामपंचायतमध्ये 64 लाख रुपयांचा अपहार? चौकशी सुरू

रामगड ग्रामपंचायतमध्ये 64 लाख रुपयांचा अपहार? चौकशी सुरू

0
75

कुरखेडा : कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या रामगड ग्रामपचायत मध्ये 63 लाख 94 हजार रुपयांच्या निधीमध्ये अनियमितता, अपहार आणि बनावट दस्तावेज तयार करण्याचा प्रकार निदर्शनास आला. ई-ग्राम स्वराज्य पोर्टलवर चुकीची माहिती अपलोड केल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे ग्रामसेविका अनुसया झाळू तुमळाम अडचणीत आल्या आहेत. याशिवाय पर्यवेक्षकीय कामात ढिलाई दिल्यामुळे विस्तार अधिकाऱ्यावरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कुरखेडाच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत करत 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

याप्रकरणी प्राथमिक माहितीनुसार, ग्रामसेविका अनुसया तुमळाम यांनी चौकशी अधिकाऱ्यांना दस्तावेज देण्यास नकार दिला. ही कृती प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करणारी आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा अधिकाऱ्यांचा दाट संशय आहे. तो उखरून काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

या मुद्द्यांवर होणार चौकशी

1) वित्त आयोग आणि पेसा अंतर्गत प्राप्त निधीचा विनियोग महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 नुसार झाला आहे किंवा नाही. 2) ई-ग्राम स्वराज्य पोर्टलवर विधीग्राह्य ठराव आणि कामांचे प्रत्यक्ष फोटो अपलोड न करता चुकीचे फोटो व बनावट दस्तऐवजीकरण करून माहिती भरल्याची पडताळणी. 3) नियमानुसार महिला सभा, वार्डसभा आणि ग्रामसभांचे आयोजन न करताच वार्षिक कृती आराखडा तयार केल्याच्या आरोपाची चौकशी. 4) चौकशी अधिकाऱ्यांना अभिलेख देण्यास नकार देऊन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्तणूक) नियमाचा भंग करणे. 5) आर्थिक अनियमितता व निधीचा अपहार केल्याबद्दल शासन निर्णय 12 जून 2013 नुसार तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश असल्याने त्याबाबत स्पष्टता करणे. 6) जर आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास तुमळाम यांच्याविरूद्ध निलंबन, विभागीय चौकशी व कायदेशिर कारवाई प्रस्तावित करावी, अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख या चौकशी आदेशात करण्यात आला आहे.