27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांचे वसतिगृह तात्काळ सुरू करा ; अन्यथा आठ...

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांचे वसतिगृह तात्काळ सुरू करा ; अन्यथा आठ दिवसांत भव्य मोर्चाचा इशारा

0
18

*वंचित बहुजन युवा आघाडी व क्रांती बहुउद्देशीय संस्थेचे संयुक्त उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

अर्जुनी मोरगाव :दि.३ ऑगस्ट अर्जुनी मोरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह तात्काळ सुरू करावे किंवा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी अर्जुनी मोरगाव आणि क्रांती बहुउद्देशीय संस्था महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे अर्जुनी मोरगाव यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.

अर्जुनी मोरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह भाड्याचे असून ती जीर्ण व धोकादायक झाली असल्यामुळे ते बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन इमारत उभारूनही तिचे लोकार्पण व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने वसतिगृह अद्याप सुरू झालेले नाही.

त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब, गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर निवासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज १५ ते ३० किलोमीटर अंतरचा प्रवास गाठावा लागत असून काही विद्यार्थ्यांना स्वतःचा खर्च खासगी निवासाची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भूदंड पडत असून त्यांच्या शिक्षणावर, नियमित हजेरी पटाच्या उपस्थितीवर, परीक्षा व प्रात्यक्षिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने संयुक्त निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे, वसतिगृह बंद असलेल्या कालावधीतील प्रवास, निवास व भोजनाचा खर्च आर्थिक सहाय्य म्हणून देणे तसेच नवीन वसतिगृहाची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ते तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुढील आठ दिवसामध्ये नवीन वसतिगृह सुरू करण्यात यावे अथवा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी अर्जुनी मोरगाव व क्रांती बहुउद्देशीय संस्था महागाव यांच्या वतीने विद्यार्थी, पालक व नागरिकांसह उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

दिलेल्या मुदतीतही वसतिगृह सुरू झाले नाही किंवा पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत, तर वंचित बहुजन आघाडी व क्रांती बहुउद्देशीय संस्था महागाव च्या वतीने नव्या वसतिगृहाचे प्रतीकात्मक लोकार्पण करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग व प्रशासनाची राहील, असे नमूद करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

मुख्य मागण्या

१. विद्यार्थ्यांसाठी तात्काळ पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
२. वसतिगृह बंद असलेल्या कालावधीतील प्रवास, निवास व भोजनाचा खर्च आर्थिक सहाय्य म्हणून विद्यार्थ्यांना द्यावा.
३. नवीन शासकीय वसतिगृहाची आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे.
४. पुढील आठ दिवसांत वसतिगृह सुरू करावे किंवा पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी; अन्यथा विद्यार्थी, पालक व नागरिकांसह उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल.
५. दिलेल्या मुदतीत वसतिगृह सुरू झाले नाही किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नव्या वसतिगृहाचे प्रतीकात्मक लोकार्पण करण्यात येईल.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे उपाध्यक्ष दिपेंद्र उके, आशिष कांबळे, लोमेश सांगोळे, स्वप्नील उके, विश्वरत्न रामटेके, प्रशिक मोटघरे, मुनेश्वर वाघमारे, वैभव मोटघरे, आशिष मेश्राम, शैलेश मोटघरे, कपिल सुखदेवे यांच्यासह प्रामुख्याने विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.