23.7 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home गुन्हेवार्ता सौंदड व चिकना/बारव्हा गावात शोककळा, दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू!

सौंदड व चिकना/बारव्हा गावात शोककळा, दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू!

0
210

भंडारा- जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पळसपाणी-चांदोरी मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात अभियांत्रिकीचे दोन विद्यार्थी मृत्युमुखी पडल्याची घटना 21 मे रोजी घडली.माहितीनुसार, शैक्षणिक सहल आटोपून परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडावर आदळले. या अपघातात सौंदड येथील कुणाल गोटेफोडे (वय २०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर लाखांदूर तालुक्यातील चिकना/बारव्हा येथील महेश टांगशेलवार (वय २०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माहितीनुसार, दोघेही करंजेकर इंजिनिअरिंग कॉलेज, साकोली येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. कॉलेजतर्फे पालोरा येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहल संपल्यानंतर दोघेही दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएन ५४९३ ने साकोलीकडे परत येत होते. दरम्यान, पळसपाणी येथील सुंदरटोला मार्गावर दुचाकी अचानक अनियंत्रित झाली व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडावर जोरदार धडकली.अपघात इतका भीषण होता की, कुणाल गोटेफोडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या महेश टांगशेलवार यांना तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शी निखिल मेश्राम यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिका सेवेला संपर्क साधून मदत बोलावली तसेच पोलिस प्रशासनालाही माहिती दिली. साकोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.अपघाताची माहिती मिळताच दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या तरुण मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. सौंदड व चिकना/बारव्हा गावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

blank