23.9 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home विदर्भ पाच-पाच एसी, बिल मात्र ५०० रुपये!महावितरणची ‘सर्जिकल स्ट्राईक’ तब्बल ६५ आलिशान बंगल्यांमध्ये...

पाच-पाच एसी, बिल मात्र ५०० रुपये!महावितरणची ‘सर्जिकल स्ट्राईक’ तब्बल ६५ आलिशान बंगल्यांमध्ये कारवाई

0
162
यवतमाळ: शहरात श्रीमंतांकडून वीज चोरीचे प्रमाण वाढल्याने महावितरणने धडक कारवाई करत, अनेक घरांवर धाड टाकत महावीजचोरीचा भंडाफोड केला. शहरातल्या पांढरकवडा मार्गावरील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गुलशन नगर आणि नागसेन सोसायटी परिसरात महावितरणने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत तब्बल ६५ आलिशान बंगल्यांमध्ये ही कारवाई केली.या हाय-प्रोफाइल कारवाईमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकच प्रचंड खळबळ उडाली असून वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.
पाच-पाच एसी, बिल मात्र ५०० रुपये!
घरामध्ये एकाच वेळी तब्बल पाच-पाच एसी सुरू होते. इतरही अनेक महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि रोषणाई होती. परंतु, या बड्या लोकांचे महिन्याचे वीज बिल अवघे ४०० ते ५०० रुपये कसे येते, या प्रश्नाचे उत्तर या कारवाईनंतर उजेडात आले. महागाईच्या काळात या श्रीमंतांची ही लुटमार पाहून प्रामाणिक ग्राहकांमधून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वीज चोरांनी महावितरणला गंडा घालण्यासाठी अनेक धक्कादायक क्लृप्त्या केल्या. काही बंगल्यांमध्ये मीटरच्या आत चोरटी यंत्रणा बसवून थेट रिमोटच्या एका क्लिकवर वीज मीटरच बंद पाडले जात होते. वीज मीटरचे रीडिंग रोखण्यासाठी खास इलेक्ट्रॉनिक जॅमरचा वापर केला जात होता. मुख्य वीज वाहिनीवर थेट हुक टाकून वीज चोरली जात होती. मीटरचे न्यूट्रल कट करून मीटरची गती शून्यावर आणली जात होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरातील वीज वापर आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये प्रचंड तफावत आढळत होती. यामुळे महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोळी, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम चव्हाण आणि कार्यकारी अभियंता संजय खंगार यांनी गुप्तपणे या महाकारवाईचा मास्टरप्लॅन आखला. संपूर्ण शहर गाढ झोपेत असताना, महावितरणच्या ६० अव्वल अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या १५ धडक पथकांनी संशयीत वीज चोरांच्या ६५ घरांवर एकाच वेळी धाड घालून ही मोहीम फत्ते केली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अवधूतवाडी आणि शहर पोलीस ठाण्याचा सशस्त्र आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.बड्या धेंडांची पळापळ; घरांना ठोकली कुलूपे!
महावितरणचे पथक आणि पोलिसांसह आल्याचे समजताच कारवाईच्या भीतीने अनेक पांढरपेशा वीज चोरांनी सकाळीच घराला कुलूप ठोकून पोबारा केला. मात्र, महावितरणने सर्व बंद घरांची वेगळी यादी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. गेले दोन दिवस राबविलेल्या या मोहितमेत वीज चोरीपोटी तब्बल एक कोटी रूपयांचा दंड महावितरणे वसूल केला. दंड वेळेत भरला नाही, तर थेट तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याचे संकेत महावितरणने दिले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे

blank