24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home महाराष्ट्र अंबाजोगाईत मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर; जयवंती नदीसह १४ नाल्यांची सफाई सुरू

अंबाजोगाईत मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर; जयवंती नदीसह १४ नाल्यांची सफाई सुरू

0
39
अंबाजोगाई: पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने सध्या मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम अत्यंत वेगाने राबविण्यात येत आहे. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेली ही मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मोहिमेमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य जयवंती नदीसह लहान-मोठ्या एकूण १४ नाल्यांची सखोल स्वच्छता करण्यात येत आहे. पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचून पाणी तुंबू नये, यासाठी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी आधुनिक यंत्रसामग्रीच्या आणि जेसीबीच्या साहाय्याने गाळ उपसण्याचे काम करत आहेत. नाल्यातून काढलेली सर्व घाण आणि कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकण्यात येत आहे, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि प्रदूषण पसरणार नाही.
या मोहिमेच्या अनुषंगाने नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. शहरात ज्या नागरिकांचे रिकामे भूखंड आहेत, त्यांनी आपल्या जागेची वेळेत स्वच्छता करून घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात अशा मोकळ्या जागांवर कचरा आणि पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होते, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखी रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. नागरिकांनी स्वच्छता राखून आपल्या शेजाऱ्यांना त्रास होणार नाही आणि शहराचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी असे प्रशासनाने म्हटले आहे.

blank