गडचिरोली:काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या ऐवजी अचानक विश्वजित कोवासे यांची नियुक्ती केल्यामुळे जिल्ह्यातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील १२ तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केले आहेत. पुढील चार दिवसांत जिल्हाध्यक्ष बदलाचा हा निर्णय मागे न घेतल्यास सर्व तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी सामूहिक राजीनामा देतील, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
पदाधिकाऱ्यांनी राजस्थानचे काँग्रेस आमदार तथा पक्ष निरीक्षक मनीष यादव यांच्या दौऱ्याचा आणि ‘संघटन सृजन अभियानाचा’ संदर्भ देत निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. जिल्हाभरातील बैठकांमध्ये तब्बल ९८% कार्यकर्त्यांनी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नावाला पसंती दिली होती, असा दावा तालुकाध्यक्षांनी केला. “कार्यकर्ते ज्याला पसंती देतील, त्यालाच अध्यक्ष केले जाईल” असे आश्वासन निरीक्षकांनी देऊनही अचानक झालेला हा नेतृत्वबदल संपूर्ण जिल्हा काँग्रेससाठी धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सातत्याने संघर्ष केला. आंदोलन, पदयात्रा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी पक्षात नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसला खासदार आणि आमदार निवडून आणण्यात यश मिळाले, याची आठवणही या वेळी करून देण्यात आली.





