सडक अर्जुनी : डुग्गीपार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फुटाळा येथील रेतीघाटावरून रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडून जप्त केले. याप्रकरणी चालक व मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २१ मे रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार डुग्गीपार पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश वणारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार शेळके, नितीन देऊरकर, पोलिस हवालदार महेंद्र सोनवणे, दीपक खोटेले, संजय चकोले, जागेश्वर उईके, महेंद्र चौधरी, बळीराम वाघाडे हे रात्री गस्तीवर असताना फुटाळा नाल्याजवळ अवैध रेती वाहतूक करीत असताना, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एआर ७००३ आरोपी श्रीकांत ठाकरे ट्रॅक्टर चालक, ट्रॅक्टर मालक नवाज पठाण कोदामेडी यांना रात्री दीड वाजता अवैध रेती वाहतूक करताना पकडले.तर दुसऱ्या घटनेतील ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एजे २०६५ ट्रॅक्टर चालक शैलेश झिंगरे घाटबोरी, ट्रॅक्टर मालक नवाज पठाण रा. कोदामेडी यांचेवर पहाटे साडेतीन वाजता अवैध रेती वाहतूक करीत असताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध रेती तस्करीला प्रतिबंध लावण्यासाठी डुग्गीपार पोलीसांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील बामणी, खडकी, चिखली, कोहमारा, चिखली, पिपरी, रेंगेपार, डुग्गीपार, देवपायली, मालीजुंगा, पांढरी, सौंदड, नवाटोला, वडेगाव, शेंडा, दोडके, केसलवाडा या परिसरातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु असून कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.





