नागपूर,दि.२४- रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने कळमना ते गोधनी दरम्यान नवा बायपास मार्ग सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे दिल्ली-हावडा मार्गावरील गाड्या नागपूर स्थानकात न येता थेट धावतील, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.महाव्यवस्थापकांकडून प्रत्यक्ष पाहणी
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी नुकताच नागपूर दौरा करून कळमना ते गोधनी या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. सद्यस्थितीत या १३.७ किलोमीटरच्या कॉर्ड लाईनचा (बायपास मार्ग) वापर केवळ मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. मात्र, नागपूर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची संख्या आणि प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा मार्ग आता प्रवासी गाड्यांसाठी सज्ज केला जात आहे. महाव्यवस्थापकांनी कामाच्या गतीबाबत समाधान व्यक्त करत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्ली-हावडा प्रवाशांचा वेळ वाचणार
या नवीन मार्गामुळे देशातील दोन प्रमुख रेल्वे मार्ग म्हणजेच दिल्ली आणि हावडा थेट जोडले जातील. दिल्लीकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांना नागपूर मुख्य स्थानकावर न आणता थेट गोधनी आणि कळमना मार्गे हावडाकडे वळवता येईल. तसेच, हावडाहून गोंदिया आणि कळमना मार्गे येणाऱ्या गाड्या नागपूर स्थानकावर न थांबता थेट गोधनीवरून दिल्लीकडे रवाना होतील. यामुळे इंजिन बदलण्याचा आणि दिशा बदलण्याचा रेल्वेचा वेळ वाचून प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण
हा मार्ग प्रवासी गाड्या चालवण्यासाठी योग्य बनवण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून सध्या ट्रॅकचे सक्षमीकरण केले जात आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा वेग आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन येथे अवजड क्षमतेचे आधुनिक स्विचेस बसवणे आणि उच्च दर्जाच्या गिट्टीचा वापर करण्याचे काम सुरू आहे. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता या मार्गाचे संपूर्ण आधुनिकीकरण केले जात आहे.
दोन रेल्वे झोनचा महत्त्वाचा दुवा
गोधनी हे मध्य रेल्वेचे नागपूर शहराच्या वेशीवर असलेले स्थानक आहे, तर कळमना हे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. हे दोन्ही वेगवेगळे रेल्वे झोन या कॉर्ड लाईनमुळे थेट जोडले गेल्याने रेल्वेच्या परिचालन व्यवस्थेला मोठी मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी ३१ जुलै २०२८ ही अंतिम मुदत निश्चित केली असून, त्यानंतर नागपूरकरांना आणि देशभरातील प्रवाशांना एका नव्या बायपास प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.





