27.5 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ वाशिमच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी व्यापक कृती आराखडा राबवा-पालक सचिव डॉ. किरण कुलकर्णी 

वाशिमच्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी व्यापक कृती आराखडा राबवा-पालक सचिव डॉ. किरण कुलकर्णी 

0
104
वाशिम, दि.25 मे – जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातन वारसा जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करत व्यापक कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिले.
जिल्ह्यातील हेरिटेज स्थळांचे संवर्धन, जतन आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने आयोजित बैठकीत त्यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्यासह पुरातत्व विभागाचे उप संचालक हेमंत दळवी हे आभासीरित्या, सहाय्यक संचालक मयुरेश खडके आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालक सचिवांनी सुरुवातीच्या टप्प्यात वाशिम आणि कारंजा या दोन तालुक्यांमध्ये हेरिटेज संवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या उपक्रमाचा विस्तार टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाशिम आणि कारंजा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी हेरिटेज लिस्टींग, डॉक्युमेंटरी आणि मॅनेजमेंट प्लॅन तातडीने तयार करावेत. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, पारंपरिक सांस्कृतिक स्थळे आणि वारसा जपणाऱ्या ठिकाणांची माहिती संकलित करून त्यांचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण करण्यात यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील विविध स्मारक आणि वारसा स्थळांच्या परिसरात माहिती फलक उभारून त्या स्थळांचा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि वैशिष्ट्ये नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच कालांतराने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वास्तूंचे संवर्धन आणि रिस्टोरेशन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा,असेही त्यांनी सांगितले.
कल्चरल हेरीटेज जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक कला, परंपरा आणि ऐतिहासिक वारशाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील टुरिस्ट प्लेसेस विकसित करणे, परिसर सुशोभीकरण, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यटन नकाशावर वाशिम जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी, वारसा स्थळांचे संवर्धन ही जिल्ह्याच्या सांस्कृतिक अस्मितेच्या जतनाची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन विकास यांचा समतोल साधत वाशिम जिल्ह्याला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येईल,असे प्रतिपादन केले.
हेरिटेज संवर्धनाबाबत जनजागृती आणि स्थानिक संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी कारंजा व वाशिम येथे विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. वारसा स्थळांच्या जतनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्थानिक प्रतिनिधींचा सहभाग आणि नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऐतिहासिक वास्तूंच्या रिस्टोरेशनसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. प्रस्ताव सादर करताना संबंधित स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व, जतनाची आवश्यकता आणि विकास आराखडा यांचा समावेश करावा, असेही पालक सचिवांनी सांगितले.बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रवी काळे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सहायक नियोजन अधिकारी संजय राठोड, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव आदी उपस्थित होते.

blank