– मजीतपूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन
गोंदिया – शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला बगल देत आता फळपिकाकडे वळणे आवश्यक आहे. आंबा पिकासाठी अनुकूल हवामान जिल्ह्यात असल्याने शेतकऱ्यांनी आंबा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी आंबा पिकाचे उत्पादन घेत त्याच्या निर्यातीवर भर दिल्यास शेतकऱ्याचे जीवनमान निश्चितच बदलेल, असा विश्वास मध्यप्रदेश शासनाचे माजी कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील मजीतपूर येथे प्रगतिशील शेतकरी भालचंद्र ठाकूर तसेच ओम ऍग्रोच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन आज 27 मे रोजी करण्यात आले होते. यावेळी आंबा उत्पादक शेतकरी व उपस्थित इतर शेतकऱ्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते.आंबा महोत्सवात १११ प्रजातीचे आंबे शेतकरी व मान्यवराकरीता बघण्याकरीता ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिक्षक निलेश कानवडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी महेंद्र ठोकडें, प्रगतशील शेतकरी गजेंद्र रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजकुमार (पप्पू) पटले, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या प्रेमलता दीदी, प्रगतिशील शेतकरी भालचंद्र ठाकूर, बालाघाट जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेखाताई बीसेन, प्रगतिशील महिला शेतकरी अंजली ठाकूर,माजी जि.प.सदस्य नरेंद्र तुरकर,पप्पु भादुपोते,पवार प्रगतिशिल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती मान्यवर आदी उपस्थित होते. सुरुवातीला प्रगतीशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी आंबा महोत्सवाचे आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी प्रगतिशील शेतकरी गजेंद्र रहांगडाले यांनी आंबा लागवड व काढणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी फळशेतीकडे वळून आपला विकास साधावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन भालचंद्र ठाकूर यांनी तर आभार श्रीमती अंजली ठाकूर यांनी मानले.





