31.8 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home गुन्हेवार्ता ‘डबल मनी’चे आमिष देत सात लाखांचा गंडा

‘डबल मनी’चे आमिष देत सात लाखांचा गंडा

0
78

गोंदिया : चार महिन्यांत पैसे दुप्पट करून देतो असे आमिष देत हॉटेल व्यावसायिकाला तब्बल सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या या प्रकारात तिघांविरुद्ध बुधवारी (दि.२७) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विनीत पुंडलीक मोहीते (४६, रा. मरारटोली) याचे गड्डाटोली परिसरात शिवभोजन थाळी केंद्र असून सन २०१८ ते २०२३ दरम्यान अजय जुमरे हा त्यांच्या घरी भाड्याने राहत होता. अजय हा एचडीएफसी बँकेत नोकरीला असल्याने विनीतचा त्याच्यावर विश्वास बसला होता. सन २०२१ मध्ये अजय जुमरे याने त्याचे मित्र विकास उमरे व आकाश उमरे हे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून काही महिन्यांत रक्कम दुप्पट करून देतात, असे सांगितले. विश्वास निर्माण करण्यासाठी अजयने स्वतः २५ हजार रुपये गुंतवून ५० हजार रुपये मिळाल्याचे विनीतला सांगितले. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये विनीतने एक लाख रुपये गुंतविले. काही महिन्यांनी त्यांना २ लाख परत रुपये मिळाल्याने त्यांचा आरोपींवर अधिक विश्वास बसला. यानंतर जून २०२२ मध्ये अजय जुमरे याने विनीतला ‘तुमच्या खात्यावर सात लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. हे पैसे डबल मनी स्कीममध्ये गुंतवा, चार महिन्यांत १४ लाख रुपये मिळतील,’ असे आमिष दिले.
आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विनीतने २ जून २०२२ रोजी सात लाख रुपये चेकद्वारे आरोपी विकास उमरे याच्या खात्यात जमा केले. चार महिने उलटल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने विनीतने वारंवार मागणी केली. आरोपींनी टाळाटाळ करीत अखेर १४ लाख रुपयांचा चेक दिला. मात्र, २८ डिसेंबर २०२२ रोजी एचडीएफसी बँकेत जमा केलेला चेक खात्यात रक्कम नसल्याने बाऊन्स झाला. त्यानंतरही आरोपींनी पैसे परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे विनीतच्या लक्षात आले. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात आरोपी अजय गणेश जुमरे, विकास प्रमोद उमरे आणि आकाश प्रमोद उमरे (सर्व रा. बालाघाट-मध्यप्रदेश) लांजी, यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नागरगोजे करीत आहेत.

blank