26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home गुन्हेवार्ता जंगलात मानवी कवटी आढळली; अर्जुनी मोर पोलिसांची चौकशी सुरू

जंगलात मानवी कवटी आढळली; अर्जुनी मोर पोलिसांची चौकशी सुरू

0
73

अर्जुनी मोर –तालुक्यातील तावशी ते इटखेडा मार्गालगतच्या जंगल परिसरात मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अर्जुनी मोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी दुपारच्या सुमारास गावातील एक व्यक्ती जंगलात भाजी तोडण्यासाठी गेली असता त्याला झुडपी जंगलात मानवी कवटी दिसून आली. त्याने तत्काळ ही बाब गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पाटील व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना झुडपी जंगलात मानवी कवटी आढळून आली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली; मात्र इतर कोणतेही मानवी अवशेष आढळून आले नाहीत.
प्राथमिक माहितीनुसार, सदर कवटी अज्ञात व्यक्तीची असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पंचनामा करून कवटी ताब्यात घेतली असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच घटनेचा सर्व अंगांनी तपास करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोर पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

blank