29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home गुन्हेवार्ता मेलेली मुलगी जिवंत परतली आणि बुलढाणा पोलिसांच्या “मानगुटी”वर बसली…

मेलेली मुलगी जिवंत परतली आणि बुलढाणा पोलिसांच्या “मानगुटी”वर बसली…

0
97

बुलढाणा-जिवंत मुलीला मृत घोषित करून तिचा खून करून प्रेत जाळले असे सांगत तिच्याच जन्मदात्या बाप व सख्ख्या भावाला पोलिस कोठडीत टाकणाऱ्या बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या “मानगुटी”वर आता तीच(शिवानी कलमेकर) मुलगी “जिवंत” होऊन बसल्याने ह्या पोलिस कर्मचाऱ्यांची पुरती “घाबरगुंडी” उडाली आहे. बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक तांबे यांनी त्या पीएसआय व तीन पोलिस कर्मचाऱ्यांना “हेडक्वार्टर अटॅच” केल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.पोउपनि. पंकज सपकाळे, पोहवा ९३८ एजाज रफीक खान, पोशि.२२२१ अमोल रमेश शेजोळ. पोशि.२३५० अजिस रहेमान परसुवाले नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा अशी त्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

ह्या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फार मोठा “धसका” घेतला आहे.पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे दाखल अप.क्र.२८३/२०२६ कलम १०३ (१), २३८ भा.न्या.सं. या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मृतक मुलगी ही दिनांक २८/०५/२०२६ रोजी जीवंत असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे उपरोक्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासात केलेल्या हलगर्जीपणाबाबत ह्या चौघांचीही चौकशी अपर पोलीस अधीक्षक, खामगांव यांच्याकडे देण्यात आली आहे. सदर चौकशी पूर्ण होण्यापर्यंत सदरहू पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांना पुढिल आदेशापावेतो त्वरीत प्रभावाने पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथे संलग्न करण्यात येत आले आहे.
१). पोउपनि पंकज सपकाळे, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा.
२). पोहेको ९३८ एजाज रफीक खान, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा.
३). पोशि/२२२१ अमोल शेजोळ, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा.
४). पोशि/२३५० अजिस रहेमान परसुवाले, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा.
ह्याबाबतचे आदेश निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा ह्यांनी कालच दिनांक.२९/०५/२०२६ ला काढले आहेत.ह्या आदेशाची प्रत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा ह्यांना देवून नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस नियंत्रण कक्ष, बुलडाणा येथे संलग्न होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
तर प्रभारी अधिकारी, नियंत्रण कक्ष, बुलढाणा यांना देखील ह्या पत्राची प्रत देऊन संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नियंत्रण कक्ष,बुलढाणा येथे संलग्न झाल्याचा अहवाल त्वरित सादर करण्यास सांगितले आहे.
एकंदरीतच खुनाच्या गुन्ह्यासारख्या तपासात हलगर्जीपणा करीत “चोर सोडून संन्याशालाच फाशी” देण्याचा प्रकार ह्या पोलिस अधिकारी व अंमलदारांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे.खामगावचे अप्पर पोलिस अधीक्षक ह्याप्रकरणी काय अहवाल देतात ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

blank