37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News आत्मसमर्पित माओवादीनी बांधली विवाह गाठ;गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल

आत्मसमर्पित माओवादीनी बांधली विवाह गाठ;गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल

0
180

blank

गोंदिया, दि.3 : अलीकडील काळात गोंदिया जिल्ह्यात एकूण 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांना पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथील पोलीस वसाहतीत ठेवण्यात आलेले आहे. या आत्मसमर्पित सदस्यांपैकी पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता या दोघांनी आजन्म सोबत राहण्याची विवाह गाठ पोलीस मुख्यालयात बांधली. त्यांच्या या लग्न सोहळ्यास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी मंजुरी देत इथेच त्यांचे लग्न लावूनही दिले.

वर- पांडू पुसू वड्डे (वय 37 वर्षे), रा.  तिरलागड, ता. पखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड), माओवादी संघटनेत गोलू या नावाने ओळखला जात होता. तो सीपीआय (माओवादी) संघटनेत दर्रेकसा एरियामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य (DVCM) म्हणून कार्यरत होता.

वधू- सैवंती रायसिंग पंधरे (वय 36 वर्षे), रा. राशीमेटा, ता. बैहर, जि. बालाघाट (मध्यप्रदेश), माओवादी संघटनेत संगीता या नावाने ओळखली जात होती. ती दरेकसा एरिया कमिटीमध्ये एरिया कमिटी सदस्य (ACM) म्हणून कार्यरत होती.

अनेक वर्षे हिंसाचार, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जीवन व्यतीत केल्यानंतर या दोघांनीही 28 नोव्हेंबर 2025 रोजी गोंदिया पोलिसा समक्ष आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजात सन्मानाने जगण्याची, स्वतःचे कुटुंब उभे करण्याची आणि शांततामय भविष्य घडविण्याची त्यांची इच्छा या निर्णयामागे होती.

हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा मिलाफ नसून हिंसेवर शांततेचा, भीतीवर विश्वासाचा आणि निराशेवर आशेचा विजय आहे. कुटुंबीय, नातेवाईक, स्थानिक नागरिक आणि पोलीस अधिकारी/ अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने नवजीवनाची, स्वीकाराची आणि सामाजिक पुनर्स्थापनेची सुंदर अनुभूती सर्वांना दिली.

शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनांतर्गत नमूद आत्मसमर्पित माओवाद्यांचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, बँक खाते आणि इतर विविध आवश्यक कागदपत्रे तयार करणे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे, तसेच त्यांचे पुनर्वसन संबंधाने इतर कार्यवाही सुरु असून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याच पुनर्वसन प्रक्रियेचा एक भावनिक आणि प्रेरणादायी टप्पा म्हणून पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे संकल्पनेतून, तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली रविवारी परिवर्तन आणि नव्या जीवनप्रवासाचे प्रतिक ठरणारा एक हृदयस्पर्शी व प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडला. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या यशाचे जिवंत उदाहरण म्हणून दोन आत्मसमर्पित सी.पी.आय. (माओवादी) नक्षल सदस्य विवाहबंधनात अडकले आणि शांततामय, सन्माननीय जीवनाची नवी सुरुवात केली.

हा प्रसंग शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा तसेच पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे. योग्य संधी, मार्गदर्शन आणि समाजाचा स्वीकार मिळाल्यास हिंसक विचारसरणीच्या प्रभावाखाली गेलेले व्यक्तीदेखील शांततेचा मार्ग स्वीकारून समाजाचे जबाबदार घटक बनू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे.

या विवाह सोहळ्यामुळे अद्याप जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी सदस्यांनाही एक सकारात्मक संदेश मिळतो की, हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यास त्यांनाही सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आनंदाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला नव्याने उभे राहण्याची आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याची दुसरी संधी मिळू शकते, हा विश्वास या घटनेने अधिक दृढ केला आहे.

संपूर्ण विवाह सोहळा शांततापूर्ण वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या पोलिस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथील प्रेरणा सभागृहात पार पडला. प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक नक्षल सेल प्रमोद भातनाते, राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे, पोलीस उपनिरीक्षक नक्षल सेल श्रीकांत हत्तीमारे, नक्षल ऑपरेशन सेल देवरी मल्लिकार्जुन वासुदेव, तसेच नक्षल सेल गोंदिया, इंटर सेल देवरी, सी 60 पथक आणि पोलिस मुख्यालय, गोंदिया येथील पोलीस स्टाफने आवश्यक समन्वय व सहकार्य उपलब्ध करून दिले.

blank