23.5 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात माधवझरी सफारी सुरू; पर्यावरण दिनी पर्यटकांना भेट

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात माधवझरी सफारी सुरू; पर्यावरण दिनी पर्यटकांना भेट

0
40

नवेगावबांध -जागतिक पर्यावरण एक दिनाचे औचित्य साधून निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी वनविभागाने नावीन्यपूर्ण भेट दिली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या वतीने शुक्रवारपासून (दि. ५) माधवझरी सफारी दर्शन या विशेष सफारीचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. ही जंगल सफारी आता पर्यटकांसाठी वर्षभर सुरू राहणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या एक पेड माँ के नाम’ या मोहिमेला प्रतिसाद देत या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
चुटिया गेटवरील माधवझरी येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा पर्यटन समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते या सफारीचे उद्घाटन करण्यात आले. वन्यजीव विभागाकडे नोंदणीकृत जिप्सी आणि मोठ्या वाहनांद्वारे पर्यटकांना ठराविक शुल्क देऊन या सफारीचा आनंद घेता येईल असे जिल्हाधिकारी गोंदावले यांनी सांगितले. नेहमीच्या वाहनातून केल्या जाणाऱ्या सफारीपेक्षा ही माधवझरी सफारी अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. यामध्ये पर्यटकांना केवळ जंगलात फिरणे एवढाच मर्यादित हेतू नसून, निसर्गाशी थेट नातं जोडण्याची संधी मिळणार आहे. नवेगावच्या जंगलाशी आणि झाडीपट्टी रंगभूमीशी जोडलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व माधवराव पाटील डोंगरवार आणि ज्येष्ठ निसर्गमित्र, अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पर्यटकांना त्यांच्या समृद्ध वारशाची माहिती घेता येईल.

माधवझरी मचान
जंगलाच्या मुख्य गाभ्यातून १ ते १.५ किलोमीटर अंतराची पायी भटकंती करत पर्यटकांना येथील वनराई आणि जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. वन्यजीवांचे विहंगम दृश्य जवळून टिपण्यासाठी वनविभागाने विशेष माधवझरी मचान तयार केला असून, येथून पर्यटकांना विलोभनीय जंगलाचा निवांत आनंद घेता येईल.
सफारीच्या शुभारंभप्रसंगी या मान्यवरांची हजेरी
उद्घाटनाप्रसंगी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालिका पीयूषा जगताप, साकोली-नागझिरा खंडाचे उपसंचालक प्रीतम सिंग कोडापे, नवेगाव-नागझिरा राखीव क्षेत्राचे विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक बाळकृष्ण दुर्गे, वन अधिकारी नंदकिशोर काळे, वन्यजीव अभ्यासक श्रीनारायण डोंगरवार, अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार मंगेश शिरसागर, वन परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके, नवेगावबांध सांझाचे महसूल अधिकारी भगवान नंदागवळी व वन्यजीव विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

blank