
मोरगाव–निलज मार्गावर,एसटी बस व टिप्परची जोरदार टक्कर
अर्जुनी मोर.दि. ६ जून,-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव–निलज मार्गावरील रामघाट जंगल परिसरात शनिवारी (दि. ६ जून) दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि मुरूम भरलेल्या टिप्परमध्ये भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टिप्पर चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनकरनगर–साकोली मार्गावरील एसटी बस निलज–मोरगाव मार्गाने प्रवास करत होती. त्याचवेळी रामघाट जंगल परिसरातून मुरूम वाहतूक करणारा टिप्पर वडणकडे जाणाऱ्या वळण मार्गावर आला.समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने बस व टिप्पर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक व प्रवासी काही काळ घाबरून गेले. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस रस्त्याबाहेर न गेल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातात टिप्परच्या पुढील भागाचे तसेच एसटी बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी टिप्पर चालकाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, जंगल परिसरातून मुरूम वाहतूक करणारा संबंधित टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. रस्त्यावरील वळण, वाहनांचा वेग अथवा निष्काळजीपणा यापैकी कोणत्या कारणामुळे अपघात घडला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.





