
8073 भावी शिक्षक व कार्यरत शिक्षक सोडविणार पेपर
गोंदिया, दि.11 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही रविवार दि.28 जून 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील 16 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत 8073 भावी शिक्षक व कार्यरत शिक्षक सहभागी होणार आहेत.
ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योग्य नियोजन व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती यांचे अध्यक्षतेखाली 18 मे रोजी सभा घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पवन खंदारे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, कोषागार अधिकारी मोहम्मद तौसिफ, डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी (योजना) संदेश जाधव, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) गजानन मंदाडे उपस्थित होते.दिनांक 28 जून 2026 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) परीक्षा आयोजनाची सविस्तर माहिती शिक्षणाधिकारी पवन खंदारे यांनी दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पुढीलप्रमाणे सूचित केले. 4 ते 5 भरारी पथके नियुक्त करण्यात यावी. 16 परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हा कोषागार कार्यालयात व्यवस्थित ठेवण्यात यावे. परीक्षेचे गोपनीय साहित्य लिक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तापमान जास्त असल्याने प्रत्येक केंद्रावर आपतकालीन वेळेसाठी कुलरची व्यवस्था ठेवण्यात यावी. आवश्यकता असल्यास उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी पेंडाल लावण्यात यावे. सर्व केंद्रांवर पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. सर्व परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा असल्याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी. दिव्यांग परीक्षार्थी यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व केंद्र संचालकांनी घ्यावी.
या वेळेत होणार परीक्षा : सदर परीक्षा गोंदिया शहरातील 10 परीक्षा केंद्रावर होणार असून पेपर क्र.1 सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत होईल. या पेपरसाठी 3707 उमेदवार परीक्षा देणार असून, पेपर क्र.2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत होईल. या पेपरसाठी 4366 उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 16 जून ते 28 जून या कालावधीत प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. सर्व परीक्षार्थ्यांनी पुरेसा अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण करावी, असे आवाहन सभेच्या माध्यमातून करण्यात आले.




