
तुमसर, ११ जून -तालुक्यातील माडगी येथील सिरिनभाई नेत्रावाला स्कूल (SNS) मध्ये ‘आरटीई २५%’ अंतर्गत पहिल्या फेरीत निवड झालेल्या ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश पडताळणी समितीकडून नाकारण्यात आल्याच्या गंभीर प्रकारावर ९ जून मंगळवार रोजी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद भंडारा येथे वादळी सुनावणी पार पडली. स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख मनोज चौबे यांच्या नेतृत्वात पालकांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निर्मला माने यांनी पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना “तुम्ही प्रत्यक्ष पालकांच्या घरापर्यंत जाऊन पडताळणी केली होती का?” असा थेट सवाल केला. मात्र, पडताळणी समितीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने समितीचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तुमसरच्या गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे आणि पडताळणी समितीच्या सदस्यांवर तीव्र आक्रोश व्यक्त केला.
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ करिता आरटीई २५% अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात पहिल्या फेरीत सिरिनभाई नेत्रावाला स्कूल, माडगी येथे ६ गरीब व गरजू विद्यार्थ्यांची निवड झाली होती. मात्र, तुमसर पंचायत समितीच्या पडताळणी समितीने नियमांचे कारण पुढे करत या सहाही विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले होते.
या अन्यायाविरुद्ध तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी ४ जून रोजी (पत्र क्र. ८१/२/२०२६) शिक्षण विभागाकडे रीतसर अपील दाखल केले होते. तसेच तुमसर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनीही यावर पत्रव्यवहार केला होता. याची दखल घेत शिक्षणाधिकारी निर्मला माने यांनी ९ जून रोजी दुपारी १२ वाजता सर्व संबंधित अधिकारी, पडताळणी समिती आणि पालकांना संपूर्ण कागदपत्रांसह सुनावणीसाठी पाचारण केले होते.
सुनावणीत पडताळणी समितीची कोंडी; पालकांचा संताप
सुनावणी दरम्यान सर्व ७ पीडित पालकांचे रीतसर जबाब नोंदवून घेण्यात आले. शिक्षणाधिकारी निर्मला माने यांनी तुमसर पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणीच्या प्रक्रियेबाबत विचारणा केली. नियमानुसार समितीने पालकांच्या घरी जाऊन वस्तुस्थिती तपासणे गरजेचे होते, परंतु कर्मचाऱ्यांना यावर योग्य उत्तर देता आले नाही.समितीच्या या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलांचे वर्ष वाया जाण्याच्या भीतीने उपस्थित पालकांचा संयम सुटला आणि त्यांनी गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे व पडताळणी कर्मचाऱ्यांविरुद्ध सभागृहातच संताप व्यक्त केला.
शिक्षणाधिकाऱ्यांचे दोन दिवसांत योग्य निर्णयाचे आश्वासन
पालकांचे म्हणणे आणि पडताळणी समितीचा गोंधळ ऐकल्यानंतर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निर्मला माने यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल शहानिशा करून येत्या दोन दिवसांत योग्य व उचित निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता या ७ विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या सुनावणीला शिक्षणाधिकारी (प्राथ.) निर्मला माने, उपशिक्षणाधिकारी मोहन उशिर, उपशिक्षणाधिकारी राहुल बावा, तुमसरच्या गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे, शिक्षण विस्तार अधिकारी टेकलाल पुष्पतोडे, केंद्रप्रमुख अशोक खेताडे, केंद्रप्रमुख दिनेश बोडमारे यांच्यासह स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, युवासेना जिल्हाप्रमुख मनोज चौबे आणि सुधाकर किशोर सहारे (गांधी वार्ड, देव्हाडी), कोमल बोंदरे (माडगी), पुरुषोत्तम ढबाळे (माडगी रोड, चारगाव), रवि प्रल्हाद मेश्राम (गांधी वार्ड, देव्हाडी), विठ्ठल डायरे (ढोरवाडा), लक्ष्मीकांत यादव (खापा), रितेश सेलोकर (पांजरा) पीडित पालक उपस्थित होते. या सुनावणीदरम्यान ॲड. दिलीप भोयर यांनी पालकांच्या वतीने कायदेशीर बाजू मांडली.




