24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिजोरीत ‘ठणठणाट’ !गरज ९० लाखांची मिळतात फक्त २० लाख

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिजोरीत ‘ठणठणाट’ !गरज ९० लाखांची मिळतात फक्त २० लाख

0
100

१० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढण्याची मुभा

गोंदिया, १३ जून-शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (जीडीसीसी) सध्या रोख टंचाई निर्माण झाली असून, तिजोरीत ठणठणाट असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ २ ते १० हजार रुपये इतकीच रक्कम दिली जात असल्याने बँक प्रशासनाविरोधात नाराजी आणि संताप वाढत आहे. खरीप हंगामाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते व शेतीच्या इतर कामांसाठी पैशांची गरज आहे; मात्र खात्यात कर्जाची रक्कम जमा असूनही ती पूर्णपणे काढता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याप्रकाराने शेतकऱ्यांवर खाजगी सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज दिले जाते. एकट्या गोरेगाव शाखेत सुमारे २५ हजार ग्राहक असून, यावर्षी २,४३८ शेतकऱ्यांच्या खात्यात १७ कोटी ७लाख ३२ हजार रुपयांचे पीककर्ज जमा करण्यात आले. मात्र, कर्जाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर शेतकऱ्यांना अत्यल्प रोकड दिली जात आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडले असून, बँक प्रशासनाने तातडीने पुरेशी रोकड उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

गरज ९० लाखांची मिळतात फक्त २० लाख
गोरेगावचे शाखा व्यवस्थापक एम. ए. मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सहकारी बँक, रिजर्व्ह बँक आदी राष्ट्रीयकृत बँकांकडून मुख्य शाखा व मुख्य शाखेकडून सर्व शाखांना रोकड पुरविण्यात येते. मात्र, या राष्ट्रीयकृत बँकांकडून मुख्य शाखेला अपेक्षीत रोकड पुरवठा होत नाही. शाखेला दररोज ८० ते ९० लाख रुपयांच्या रोकडची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ १५ ते २० लाख रुपयेच उपलब्ध होत आहेत.

शेतकऱ्यांना पीककर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांकडून मागणीनुसार रोकड उपलब्ध होत नसत्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. ही समस्या लवकरच दूर होईल. दुर्गाप्रसाद ठाकरे, संचालक, जीडीसीसी बैंक