37.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home Top News बेस्ट कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी संप, बेस्ट बस संपामुळे वाहतूक विस्कळीत

बेस्ट कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी संप, बेस्ट बस संपामुळे वाहतूक विस्कळीत

0
7
मुंबई/वृत्तसेवा-बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संप केला आहे. बेस्ट बस संपामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईत रात्रीपासून बेस्ट बसच्या संपामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. लाखो प्रवासी अडकले आहेत. बेस्ट कृती समितीने प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारला आहे. सरकारने मेस्मा कायदा लावून संप बेकायदेशीर ठरवला आहे.
मुंबईमध्ये लाईफलाईन समजली जाणारी बेस्ट सेवा रात्रीपासून बंद झाली आहे. बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सकाळी कामावर आणि शाळा-कॉलेजात जाणाऱ्या लाखो प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये बेस्टच्या बसच आलेल्या नाहीत. त्यामुळे लाखो प्रवासी बेस्ट विना अडकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव, ओशिवरा, वडाळा, मरोळ आणि कुर्ला डेपोतून सकाळी एकही बेस्ट बस बाहेर पडलेली नाही. मुंबईतील सर्वच डेपोमध्ये अशी परिस्थिती असल्याचा दावा मुंबईतील कामगार संघटनांनी केला आहे. अचानक सुरू झालेल्या या बेस्ट कर्मचार्यांच्या संपामुळे मुंबईतील रेल्वे स्थानके आणि रिक्षा-टॅक्सी स्टँडवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
नियमित नियोजनाने बाहेर पडलेल्या मुंबईतील प्रवाशांना मात्र या बेस्टच्या कर्मचारी संपामुळे उशिर होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात सर्वच कामगार सहभागी असल्याचा दावा केला आहे. मुंबईतील बेस्ट वर्कर्स युनियन या काम बंद आंदोलनात सहभाग घेणार नाही, अशी माहिती मिळाली आहेे. त्यामुळे कामगारांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.
बेस्ट उपक्रमाचा मुंबई महानगरपालिकेत समावेश करून घेण्यात यावा, ही कृती समितीची सर्वात प्रमुख मागणी आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची देयके व बेस्टच्या सर्व निवृत्त कामगारांचे रखडलेले पैसे आणि इतर सर्व देयके तातडीने देण्यात यावीत, अशा काही मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रशासनासमोर आणि राज्य सरकारसमोर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. 12 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार बेस्ट कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, बस सेवा आणि वीजपुरवठा या अत्यावश्यक सेवा असल्यामुळे कोणत्याही प्रकारे कामकाजात अडथळा निर्माण करता येणार नाही.