37.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home महाराष्ट्र महिला व बालकल्याण विभागात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा, संबंधित कर्मचारी व कंत्राटदारावर कारवाईची...

महिला व बालकल्याण विभागात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा, संबंधित कर्मचारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी

0
6
रायगड/वृत्तसेवा-रायगड जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. संबंधित कर्मचारी व कंत्राटदारावर,विभागातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बालकल्याणच्या सभापतींनी केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नवनिर्वाचित महिला आणि बालकल्याण समिती सभापती रसिका केनी यांनी स्वतः या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. महिला आणि बालकल्याण विभागात कोणतेही काम प्रत्यक्षात पूर्ण होण्याआधीच कंत्राटदारांना कोट्यावधी रुपयांची बिले मंजूर करण्यात आली आहेत. बालकल्याण विभागात अडीच कोटी रुपयांचा हा घोटाळा झाला आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन करून ही बिले घाईत मंजूर करण्यात आल्याचा आरोप सभापती रसिका केनी यांनी केला आहे.
या संपूर्ण भ्रष्टाचाराला महिला आणि बालकल्याण विभागाच्या प्रमुख निर्मला कुची याच मुख्य जबाबदार असल्याचा आरोप रसिका केनी यांनी केला आहे. बालकल्याण विभागाच्या प्रमुख निर्मला कुची यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी निधीचा गैरवापर केल्याचे सभापती रसिका केनी यांनी म्हण्टले आहे. या प्रकरणात बालकल्याण विभागाच्या प्रमुख निर्मला कुची यांच्यासह इतर कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सभापती रसिका केनी यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यात कामासाठी सक्षम आणि पात्र स्थानिक कंत्राटदार उपलब्ध आहेत. तरीही, रायगडमधील स्थानिक लोकांची जाणूनबुजून कोणतीही कामे दिली जात नसल्याची घटना समोर आली आहे. बालकल्याण विभाग प्रमुख निर्मला कुची या आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांच्या ओळखीच्या पुण्यातील कंत्राटदारांनाच सर्व कामे देत असल्याचा खळबळजनक आरोप सभापती रसिका केनी यांनी केला आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक कामगार आणि कंत्राटदारांवर मोठा अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यात महिला आणि बालकल्याण विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या गरोदर माता पोषक किट योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. कागदोपत्री 100 टक्के काम दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात 25 टक्के लाभार्थी गरोदर मातांपर्यंतच या पोषक किटचा लाभ पोहोचला आहे. बाकी 75 टक्के निधी आणि किट नक्की कुठे गेले? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. माता आणि बालकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
या सर्व गंभीर प्रकारानंतर सभापती रसिका केनी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सभापती रसिका केनी यांनी केली आहे. रायगडमधील या घोटाळ्यामुळे भ्रष्ट अधिकार्यांमध्ये आता भीती पसरली आहे.