32.4 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ हातेडी येथे सीपीएचसी प्रशिक्षण;आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धिंगत करण्यावर भर

हातेडी येथे सीपीएचसी प्रशिक्षण;आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धिंगत करण्यावर भर

0
15
बुलढाणा,दि.25 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रांचे बळकटीकरण आणि ग्रामीण जनतेपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र हातेडी (ता. बुलढाणा) येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण उत्साहात पार पडले. ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव – कसं काय?’ अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवून नागरिकांना प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक अशा सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. विविध स्किल स्टेशनच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये गरोदर माता व प्रसूती सेवा, नवजात शिशु व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग नियंत्रण, नेत्र आरोग्य, कान-नाक-घसा सेवा, मौखिक आरोग्य, मानसिक आरोग्य, वृद्धांची काळजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच योग व आरोग्य संवर्धन अशा १३ प्रकारच्या आरोग्य सेवांचा समावेश होता.
यावेळी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि मानसिक तणाव यांसारख्या वाढत्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. “रुग्ण दवाखान्यात येण्यापूर्वी आरोग्य सेवा त्यांच्या दारात पोहोचली पाहिजे. हे प्रशिक्षण ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी ठरले पाहिजे,” असे ते म्हणाले.
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल यांनी सांगितले की, राज्यातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) आणि आशा स्वयंसेविकांना CPHC चे प्रभावी प्रशिक्षण दिले जात आहे. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत नागरिकांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरपंच श्रीकांत जाधव यांनी “आरोग्य सेवा हीच पूजा, रुग्ण हाच परमेश्वर” हा संदेश देत आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवाभावाने कार्य करण्याचे आवाहन केले. बुलढाणा जिल्ह्याला ‘आरोग्य संपन्न जिल्हा’ बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
प्रशिक्षणासाठी डॉ. निलेश जाधव, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. जीवन भारती, डॉ. संतोष सांगळे, स्वाती शेंद्रे, सुवर्णा बेलसरे, सुनिता जवंजाळ, कविता खाडे आणि सुलोचना परहाड यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. तसेच राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर अंतर्गत अमरावती येथील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे संदेशजी लाटकर आणि भाऊसाहेब वावरे यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
सदरील प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी आरोग्य पर्यवेक्षक सुनील लोखंडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र हातेडी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळच १३ प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेला बळकटी देणारे हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.