35.3 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ जिल्ह्याच्या सुपुत्राकडे आरोग्य विभागाची धुरा; डॉ. रणजीत मंडाले यांची जिल्हा आरोग्य अधिकारीपदी...

जिल्ह्याच्या सुपुत्राकडे आरोग्य विभागाची धुरा; डॉ. रणजीत मंडाले यांची जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती

0
45
बुलढाणा,दि.25 : बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) पदाची धुरा जिल्ह्याचे सुपुत्र तथा सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील रहिवासी डॉ. रणजीत मंडाले यांच्या हाती सोपविण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार त्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आरोग्य सेवेत विविध जबाबदाऱ्यांवर कार्य करताना डॉ. मंडाले यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या प्रशासनिक अनुभव, कार्यतत्परता आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालय, देवळगाव मही येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर मलकापूर-पांगरा प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच मेहकर येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी प्रभावीपणे जबाबदारी सांभाळली. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने त्यांची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती केली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शासनाच्या सर्व आरोग्य योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे डॉ. मंडाले यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि गतिमान करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
डॉ. रणजीत मंडाले यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला नवे नेतृत्व लाभले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गतिमान आणि लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.