देसाईगंज, विशेष प्रतिनिधी दि. २९: गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील रहिवासी रामदास हरिजी ठाकरे या सामान्य नागरिकाला महावितरणच्या स्मार्ट मीटरने जोरदार ‘शॉक’ दिला आहे.वीज वितरण कंपनीने जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ठाकरे यांना दहा-वीस हजार नव्हे, तर थेट 4,79,060 रुपये इतक्या भरमसाठ रकमेचे वीज देयक आले आहे. हे बिल पाहून ठाकरे कुटुंबाला अक्षरशः घाम फुटला असून त्यांना धक्काच बसला आहे.
समाज माध्यमात व्हायरल:
या अवाढव्य बिलाचा फोटो सध्या व्हॉट्सॲप, फेसबुकवर वाऱ्यासारखा पसरला आहे. “सामान्य माणसाने कारखाना चालवला काय?” असा संतप्त सवाल नेटकरी विचारत आहेत.
महावितरणच्या अजब कारभारावर संताप:
एका सर्वसामान्य कुटुंबाच्या घरात ना एसी, ना मोठी यंत्रसामग्री, तरीही पावणे पाच लाखांचे बिल कसे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्मार्ट मीटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या ‘मीटरच्या मनमानी’ कारभाराविरोधात देसाईगंज परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.”आधीच महागाईने मेटाकुटीला आलोय, त्यात महावितरणचा हा ‘स्मार्ट’ दरोडा सहन करणार कसा?” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
प्रशासन काय म्हणतं?
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘तांत्रिक बिघाडामुळे असे बिल आले असावे, चौकशी करून दुरुस्ती केली जाईल’ असे मोघम उत्तर दिले. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.





