तिरोडा ः तिरोडा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, विद्यार्थी, महिला, वृद्ध कलाकार व विविध योजनांतील लाभार्थी यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर, युवा बेरोजगार संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २९) येथील गांधी पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात माजी आमदार दिलीप बन्सोड, राधेलाल पटले, वाय. टी. कटरे, रमेश टेंभरे, ओम पटले, रमेश आंबुले,सशेंद्र भगत, जगदीश येरोला,ओमप्रकाश कटरे,राजकुमार पटले,शिव नागपूरे,लक्ष्मीनाराायण दुबे,महेंद्र भांडारकर,हितेंद्र बावने यांच्यासह शेतकरी, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, खरीप धानाचे थकीत पैसे व बोनस तातडीने द्यावा, बियाणे व रासायनिक खते शासकीय दरात उपलब्ध करून द्यावीत, खतांच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात, बेरोजगार युवकांना तत्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा, जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीककर्जाचे वितरण त्वरित करावे, बँकांमध्ये पुरेशा रोख रकमेची व्यवस्था करावी, कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ चे पाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी भदभद्या तलावात सोडावे, वाढीव वीजबिले कमी करावीत, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, अदानी पॉवर प्रकल्पात स्थानिक युवकांना नियमित रोजगार द्यावा, वृद्ध कलाकारांचे थकीत मानधन त्वरित अदा करावे आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवला. नीट व टीईटी परीक्षांतील कथित पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळावा, नामंजूर अर्जांचा फेरविचार करून मंजुरी द्यावी, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमिहीन आणि श्रावणबाळ योजनेचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.




