24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home शैक्षणिक जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

0
67

अर्जुनी-मोर.दि.30 जुन : गोंदिया जिल्ह्यात आजपासून शैक्षणिक वर्ष 2026-27 ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजोरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हाय स्कूल बोंडगाव देवी, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव अर्जुनी, अर्जुनी मोर.,अरततोंडी,पिंपळगाव, खांबी येथे नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्सुकता आणि नव्या शैक्षणिक प्रवासाची ओढ पाहून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी गावातून भव्य शैक्षणिक रॅली काढण्यात आली. “प्रत्येक मूल शाळेत, प्रत्येक मूल शिक्षणात” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध घोषणांद्वारे शिक्षणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले. या रॅलीला पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय बॅग, पाठ्यपुस्तके तसेच विविध शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातात नवीन शैक्षणिक साहित्य मिळताच त्यांच्या आनंदाला उधाण आले. पालकांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष भेंडारकर म्हणाले की, “शिक्षण हेच जीवनातील यशाचे सर्वात प्रभावी साधन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर आपली स्वप्ने पूर्ण करावीत. शिक्षणासोबतच खेळ, कला, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांचाही अंगीकार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, पालक आणि समाज या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे.”तसेच त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका आणि सर्व संबंधितांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधून नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, अभ्यासाबरोबरच विविध सहशालेय उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, स्थानिक पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे आनंददायी स्वागत, शैक्षणिक जनजागृती रॅली, शालेय साहित्याचे वितरण आणि शिक्षणाविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे गोंदिया जिल्ह्यातील शाळा प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.