गोंदिया,दि.१२ः-गोंदिया एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येत असलेल्या धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय,गोंदिया येथील रेडरिबन क्लब (RRC), यूथ रेडक्रॉस क्लब (YRC) आणि सूक्ष्मजीव शास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागाने,महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (MSACS), अंतर्गत तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (DAPCU), कुँवर तिलकसिंग जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया यांच्या सहकार्याने एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने“HIV/AIDS: Rethink. Rebuild. Rise.” या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा व विस्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज पटले आणि प्राचार्य संजय नालमवार यांच्या मार्गदर्शनाखाली, रेडरिबन क्लब (RRC) व यूथ रेडक्रॉस क्लब (YRC)च्या समन्वयक डॉ. संध्या तांबेकर वंजारी यांनी मनोहर म्युनिसिपल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, गोंदिया, येथे विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रशिक्षण कार्यशाळा व विस्तार कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये रेडरिबन क्लब (RRC) आणि यूथ रेडक्रॉस क्लब (YRC) मधील एकूण १० प्रशिक्षित सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सचाप्रसार, प्रतिबंध, तपासणी, उपचार आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत शास्त्रीय वअचूक माहिती देण्यात आली. प्रशिक्षित विद्यार्थ्यांना समवयस्क शिक्षणदूत (Peer Educators) म्हणून कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करण्यातआले, जेणे करून ते महाविद्यालय व शाळेच्या परिसरात तसेच समाजामध्ये एचआयव्ही/एड्स विषयी योग्य माहिती पोहोचवू शकतील. कार्यक्रमा दरम्यान प्रकाश बोपचे, RRC सदस्य आणि समन्वयक डॉ. संध्या तांबेकर वंजारी यांनी एचआयव्ही/एड्स जन जागृती विस्तार उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक ज्ञानाचा समाजाच्या आरोग्यविषयक गरजांशी प्रभावीपणे संबंध जोडला जातो. विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच समाजातील नागरिकांना एचआयव्ही चा प्रसार, प्रतिबंध, तपासणी, उपचार आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याबाबत जागरूक करण्यासाठी हे उपक्रम प्रभावी माध्यम ठरतात. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश एचआयव्ही/एड्सविषयी अचूक, वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित करणे तसेच समाजातील गैरसमज व मिथक दूर करणे हा होता. सहभागी विद्यार्थ्यांना हे स्पष्ट करण्यात आले की, हात मिळवणे, मिठी मारणे, एकत्र बसणे, एकत्र भोजन करणे किंवा दैनंदिन सामाजिक संपर्कामुळे एचआयव्हीचा संसर्ग होत नाही. याविस्तार उपक्रमाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य विषयक सवयी, जबाबदार वर्तन, वेळेवर एचआयव्ही तपासणी आणि आवश्यक आरोग्य सेवा घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विशेषतः युवकांमध्ये आरोग्यविषयक योग्य ज्ञान निर्माण करून त्यांना जबाबदार व सुजाण निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. एचआयव्ही/एड्सशी संबंधित कलंक, भेदभाव आणि सामाजिक बहिष्कार कमी करणे हा या कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश होता. एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींबद्दल सहानुभूती, समजूतदारपणा आणि सामाजिक स्वीकाराची भावना निर्माण करून एक समर्थक व समावेशक समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले. अशाप्रकारचे एचआयव्ही/एड्स जनजागृती विस्तार उपक्रम केवळ माहिती प्रसारित करण्यापुरते मर्यादित न राहता आरोग्यशिक्षण, रोगप्रतिबंध, लवकर निदान, सामाजिक जबाबदारी, कलंक निर्मूलन आणि समाजातील सक्रिय सहभाग यांना चालना देतात. त्यामुळे सुजाण, निरोगी, संवेदनशील आणि एचआयव्ही मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.एकूण ७५ महाविद्यालयीन विद्यार्थी, RRC व YRC सदस्य, समन्वयक डॉ. संध्या तांबेकर वंजारी तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (DAPCU), कुँवर तिलकसिंग जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया यांच्या प्रतिनिधींनी या प्रशिक्षण कार्यशाळा व विस्तार उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.





