तुमसर (प्रतिनिधी): तुमसर शहरातील प्रभाग क्र. ११, दुर्गा नगर येथील अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्ता बांधकामाची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीला दीड महिना उलटूनही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. केवळ ‘७ दिवसांत’ चौकशी अहवाल सादर करण्याचे कडक आदेश असतानाही, दीड महिना प्रशासकीय फाईल दाबून ठेवण्यात आल्याने भ्रष्ट कंत्राटदार आणि चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक साठेलोट असल्याचा संशय बळावला आहे. या दिरंगाईविरोधात स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी थेट विभागीय सह-आयुक्त (नगरपालिका प्रशासन), नागपूर यांच्याकडे धाव घेत तक्रार केली आहे.
तुमसर शहरातील प्रभाग क्र. ११, दुर्गा नगर येथील राजेंद्र बिसने ते राकेश कामथे यांच्या घरापर्यंत सुमारे १४० मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम रमा कंट्रक्शनच्या माध्यमातून करण्यात आले. परंतु, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व निकषांना डावलून केल्याचे उघडकीस आले होते. या भ्रष्टाचाराविरोधात स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित मेश्राम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख मनोज चौबे यांनी ९ मे २०२६ रोजी जिल्हा प्रशासनाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा सह-आयुक्त, नगरपालिका प्रशासन, भंडारा यांनी १५ मे २०२६ रोजी (जा.क्र. ७०७/२०२६) आदेश काढून एक उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्षपद लाखनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आशिष घोडे यांच्याकडे सोपवण्यात आले असून, भंडारा व लाखनी येथील स्थापत्य अभियंत्यांचा यात समावेश करण्यात आला होता.
आदेशाला केराची टोपली; कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न?
जिल्हा सह-आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद होते की, चौकशी समितीने ७ दिवसांच्या आत प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अनुपालन अहवाल सादर करावा. कामात हयगय किंवा टाळाटाळ केल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा कडक इशाराही देण्यात आला होता. परंतु, आज या आदेशाला दीड महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. ७ दिवसांचे काम दीड महिना प्रलंबित का ठेवण्यात आले? चौकशी समितीने अद्याप अहवाल का सादर केला नाही? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. स्थानिक प्रशासन आणि चौकशी समिती जाणीवपूर्वक कंत्राटदाराला पाठीशी घालत असून, जनतेच्या करातून जमा झालेल्या शासकीय निधीची उघड लूट करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
आता थेट नागपूर विभागीय सह-आयुक्तांकडे तक्रार…
स्थानिक पातळीवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून, स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी आता थेट विभागीय सह-आयुक्त (नगरपालिका प्रशासन), नागपूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या पत्रव्यवहारामुळे आता नागपूर विभागातील वरिष्ठ प्रशासन भंडारा व तुमसर येथील दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण तुमसरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शासकीय आदेशांचे उल्लंघन करून भ्रष्टाचाराची फाईल दाबणाऱ्या चौकशी समितीच्या तिन्ही अधिकाऱ्यांवर तात्काळ विभागीय व शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित दोषी कंत्राटदाराला तातडीने काळया यादीत टाकून, हा रस्ता त्याच्याच खर्चाने पुन्हा नव्याने तयार करून घेण्यात यावा.
–अमित मेश्राम, संस्थापक अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाउंडेशन तुमसर, जिल्हा भंडारा.





