गडचिरोली, दि. १ जुलै : देसाईगंज तालुक्यात महसूल विभागाने प्रतिबंधित केलेल्या रेतीघाटातच अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा बळी गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने जिल्हा प्रशासन हादरले असून थेट दोन महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दहा जूनपासून देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कोंढाळा-सिंड्राई रेतीघाट महसूल विभागाने पूर्णपणे प्रतिबंधित केला होता. असे असतानाही वैनगंगा नदी परिसरात दिवसाढवळ्या अवैध रेती वाहतूक सुरू होती. याच अवैध वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. प्रसार माध्यमांनी हे प्रकरण लावून धरताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.
जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : दोन अधिकारी निलंबित
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तत्काळ जिल्हा भरारी पथकामार्फत स्थळ पाहणी करून चौकशीचे आदेश दिले. पथकाच्या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या. १० जून २०२६ नंतर रेतीघाटावरील उत्खनन पूर्णपणे बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही त्या ठिकाणी अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.या अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक महसूल यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना टिचकुले आणि तलाठी श्री. महादास ठाकरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
तहसीलदार वाचवण्यासाठी ‘राजकीय रस्सीखेच’?
दरम्यान, तहसीलदार श्रीमती प्रीती डुडूलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्यामार्फत आजच शासनाच्या महसूल विभागाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, शासनाने तहसीलदारांना निलंबित करू नये यासाठी एका माजी आमदाराने आज मंत्रालयात ‘अर्थपूर्ण फील्डिंग’ लावल्याची जोरदार चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
जुने कनेक्शन उघड :
सन २०२३ मध्ये चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार असताना याच माजी आमदाराने देसाईगंज येथून बदली झालेल्या तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्याच्या मौखिक शिफारशीवरून सदर तहसीलदाराची बदली देसाईगंज तहसील कार्यालयात होण्यासाठी अधिकृत शिफारसपत्र दिल्याची विश्वसनीय माहिती हाती लागली आहे. त्यामुळेच आता तहसीलदारांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
एकाचा बळी, महसूलचे ‘अर्थकारण’ उघड
या संपूर्ण प्रकरणामुळे देसाईगंज तालुक्यातील रेतीमाफिया आणि महसूल विभागातील ‘अर्थपूर्ण संबंध’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. प्रतिबंधित घाटातही दिवसाढवळ्या रेती उपसा होत असेल तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.





