25.7 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी,बळीराजा सुखावला;  शेतीच्या कामांना वेग

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी,बळीराजा सुखावला;  शेतीच्या कामांना वेग

0
7

गोंदिया ः पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवारी (ता. १) मध्यरात्री आलेल्या दमदार पावसाने दिलासा दिला आहे. मध्यरात्री धो-धो बरसलेल्या पावसाची सकाळपासून दुपारपर्यंत रिपरिप सुरूच होती. दरम्यान, या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आले आहे.जून महिन्यापासून आतापर्यंत झालेल्या पावसाची नोंद पाहता सरासरीच्या तुलनेत फार कमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात २०६.२ मि. मी. पाऊस अपेक्षित असताना केवळ ८५.६ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.सालेकसा तालुक्यात ७९.५ मि. मी. पाऊस झाला असून, अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर लागलेल्या आद्रा नक्षत्रानेही दगा दिला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. विशेष म्हणजे, पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकर्‍यांच्या पेरण्याही खोळंबल्या होत्या. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातच बुधवारी मध्यरात्रीनंतर दमदार पावसाने सुरवात केली. दुपारपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. दरम्यान, हवामान खात्याकडून १ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घेण्यात आलेल्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात गोंदिया तालुक्यात ४०.८ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आमगाव तालुक्यात ५७.२ मि. मी., तिरोडा १.३ मि. मी., गोरेगाव ५५.८ मि. मी, देवरी १८.४ मि. मी., अर्जुनी मोरगाव ५.० मि. मी., सडक अर्जुनी २०.८ मि. मी. तर, सालेकसा तालुक्यात ७९.५ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.