24.8 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home Top News नवजात बालक विक्रीप्रकरणी भाजपशी संबंधित दोन महिलांना अटक; न्यायालयीन कोठडी

नवजात बालक विक्रीप्रकरणी भाजपशी संबंधित दोन महिलांना अटक; न्यायालयीन कोठडी

0
42

रामनगर पोलिसांची कारवाई; मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात उघडकीस आलेल्या नवजात बालकांच्या विक्रीप्रकरणी रामनगर पोलिसांनी भाजपशी संबंधित आणखी दोन महिलांना अटक केली आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.नवजात बाळ विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणातील दस्तऐवजीकरण आणि इतर प्रक्रियेत मदत केल्या प्रकरणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक तथा भारतीय जनता पक्षाशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दोघींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही महिला भाजपशी संबंधित

रामनगर पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बालक खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांना अटक केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध मानवी तस्करी तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान नवजात बालकांच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियेत दोन महिला पदाधिकाऱ्यांची भूमिका समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री सायली येरणे व भाग्यश्री हांडे या दोघींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईनंतर प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मे महिन्यात चंद्रपूरमध्ये दोन नवजात बालकांची पैशांच्या मोबदल्यात विक्री झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. तपासादरम्यान एका महिलेने आर्थिक लाभासाठी स्वतःच्या दोन नवजात बालकांची विक्री केल्याचे समोर आले. तसेच तिच्या अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या नवजात बालकाचीही विक्री करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आणि संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.