24.5 C
Gondiā
Friday, July 3, 2026
Home शैक्षणिक शाळेत वर्गखोल्यांची वानवा, तुटके-फुटके बाके अन् अपूर्ण शिक्षकसंख्या

शाळेत वर्गखोल्यांची वानवा, तुटके-फुटके बाके अन् अपूर्ण शिक्षकसंख्या

0
42

भौतिक सुविधांसाठी ग्रामपंचायतीकडे शालेय व्यवस्थापन समितीचे निवेदन

चिचगड, दि. ३ जुलै : जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा, चिचगड येथे वर्गखोल्यांची कमतरता, तुटके-फुटके डेस्क-बेंच, अपूर्ण शिक्षकसंख्या आणि अन्य मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भूपेंद्र मस्के यांनी ग्रामपंचायतीकडे आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात शाळेत २४३ विद्यार्थी, ६ शिक्षक आणि ४ इमारती आहेत. मात्र, वाढत्या विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत उपलब्ध वर्गखोल्या व सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक डेस्क-बेंच जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रार्थनेसाठी स्वतंत्र शेड नसल्याने उन्हाळा व पावसाळ्यात गैरसोय होत आहे. तसेच सोलर प्रणाली, सीसीटीव्ही आणि विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीचीही आवश्यकता आहे.
निवेदनात १०० डेस्क-बेंच, प्रार्थना शेड, सोलर दुरुस्ती, सीसीटीव्ही व विद्युत दुरुस्ती, ७ व्हाईट बोर्ड तसेच वार्षिक विद्युत भरण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यापैकी डेस्क-बेंच, प्रार्थना शेड आणि विद्युत भरणा ही कामे अत्यंत तातडीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती आमदार संजय पुराम, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. गोंदिया), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह रिक्त शिक्षकपदे तातडीने भरावीत, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे.