25.7 C
Gondiā
Saturday, July 4, 2026
Home विदर्भ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भरपावसात जि.प.वर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भरपावसात जि.प.वर मोर्चा

0
7

गोंदिया : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बाल कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी (दि. ३) भरपावसात विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, विठा पवार, जिल्हा सचिव पौर्णिमा चुटे, जीवनकला वैद्य, अनिता शिवनकर यांनी केले.आंदोलनात बिरजूला तिडके, अंजना ठाकरे, कांचन शहारे, पुष्पा भगत, शामकला मसराम, पंचशिला शहारे, प्रणिता रंगारी, वीणा गौतम यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
मोर्चाला येथील जयस्तंभ चौकातून सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. यानंतर हा मोर्चा जि. प.वर धडकला. यावेळी मोर्चात सहभागी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद समोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी झेनितचंद्रा दोंतुला यांना देण्यात आले. त्यात प्रामुख्याने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन लागू करण्यात यावी. ग्रॅज्युइटीचा संपूर्ण लाभ देण्यात यावा अंगणवाडी सेविका कुपोषणमुक्त करतात परंतु त्यांना मेडिकलचा लाभ मिळत नाही. मेडिकल लाभ देण्यात यावा. २०२४ मध्ये मानधन वाढ करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने २ हजार रुपये सेविकांना व एक हजार रुपये मदतनीस यांना प्रोत्साहन भत्त्यामध्ये वर्ग केले. ते सरळ मानधनात वर्ग करण्यात यावे, अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी अतिरिक्त काम देऊ नये असे वरिष्ठ अधिकारी, मंत्री, आयसीडीएसचे पत्रक असून ही बीएलओची कामे देत आहेत. तर काही ठिकाणी तहसीलदार कारवाईची धमकी देत आहेत हा प्रकार थांबविण्यात यावा. आदी मागण्यांचा समावेश आहे.