गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आणि दुर्गम भागातील नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष दर्जा तपासण्यासाठी गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार यांनी नुकतीच डोंगरगाव आणि गंगाझरी येथील आरोग्य उपकेंद्रांना अचानक भेट दिली. या नियोजनबद्ध दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय लसीकरण मोहीम, साथरोग नियंत्रण आणि उपकेंद्रांमधील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.
दौऱ्याची सुरुवात करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार यांनी डोंगरगाव आणि गंगाझरी येथील लसीकरण केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. तेथे सुरू असलेल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा सविस्तर आढावा घेत. ग्रामीण भागातील एकही बालक किंवा माता कोणत्याही परिस्थितीमध्ये लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची चोख दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. तसेच, सद्यस्थितीत उन्हाळा आणि पावसाळ्याच्या संमिश्र पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या डायरिया व डिहायड्रेशन (निर्जलीकरण) सारख्या जलजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी उपकेंद्रात विशेषत्वाने उभारण्यात आलेल्या ‘ओ.आर. टी. कॉर्नर’ची त्यांनी बारकाईने पाहणी केली. उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांना तातडीने ओ.आर.एस. आणि आवश्यक प्राथमिक उपचार मिळतील, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अचानक घेतलेल्या या भेटी दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार यांनी उपकेंद्रातील औषध साठा, हजेरी आणि एकूणच आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागात काम करताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्यांनी स्वतः जाणून घेतल्या आणि उपस्थित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकांना पुढील कामासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.





