आमगाव : ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या निमित्ताने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी तालुक्याचा दौरा करीत विविध आरोग्य केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामात सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश देत, मुख्यालयी राहूनच जनतेला आरोग्य सेवा देण्याचे सक्त आदेश दिले आहेत.या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भूमेश पटले यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार यांनी ३० जून रोजी तालुक्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आमगाव ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बाम्हणी गाव तसेच बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी थेट नागरिकांच्या घरांना भेट देत मोहिमेच्या प्रत्यक्ष कामाची खात्री केली.
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्यांनी सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, अॅनिमिया आणि रक्ताची चाचणी या संदर्भातील सद्यस्थिती जाणून घेतली. केंद्रातील ओपीडी, आयपीडी, उपलब्ध औषध साठा, लसीकरण मोहीम, लसींची गुणवत्ता आणि कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाचा वैयक्तिक आढावा घेतला व त्यांचे शासकीय रेकॉर्ड तपासले. कामकाजात अचूकता आणि गती आणण्यासाठी त्यांनी रेकॉर्ड अद्ययावत ठेवून कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.





