गोंदिया, दि. ०४ – गोंदिया नगर परिषदेच्या जीर्ण इमारतीत अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत असून शुक्रवार ३ जुर्ले रोजी उपमुख्य अधिकारी श्रीमती झलके यांच्या कक्षातील भिंत कोसळल्याची घटना घडली.गेल्यावर्षी सुध्दा काही कार्यालयाचे छत कोसळल्याची घटना घडलेली होती.या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बोरकर यांनी जीर्ण इमारतीमुळे कोणत्याही अप्रिय घटना घडू नये म्हणून न.प.च्या सर्व विभागाच्या कार्यालयांना इंदिरा गांधी स्टेडियम येथे तात्पुरत्या स्वरुपात हलविण्याचे आदेश जारी केले आहे.
जिल्ह्यातील गोंदिया शहरातही मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसालासा सुरुवात झाली आहे.सततच्या मुसळधार पावसामुळे गोंदिया नगरपरिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर,कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून नगरपरिषदेची सर्व विभागांची कार्यालये तातडीने इंदिरा गांधी स्टेडियम येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात नगरपरिषद गोंदियाचे मुख्याधिकारी यांनी ३ जुलै २०२६ रोजी आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नगरपरिषदेच्या ऐतिहासिक व जुन्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हीच बाब लक्षात घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी सर्व विभागांचे कार्यालय तात्काळ प्रभावाने इंदिरा गांधी स्टेडियममधील उपलब्ध जागेत हलवण्याचे आदेश दिले आहेत.





