25.2 C
Gondiā
Sunday, July 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश बालकांच्या सुरक्षेसाठी जागरूकता महत्त्वाची…!पॉक्सो कायद्याबाबत न्यायमूर्ती संजय देशमुख यांचे मार्गदर्शन

बालकांच्या सुरक्षेसाठी जागरूकता महत्त्वाची…!पॉक्सो कायद्याबाबत न्यायमूर्ती संजय देशमुख यांचे मार्गदर्शन

0
7
पॉक्सो जनजागृती शिबिरातून सजग समाजाचा संदेश
परभणी, दि. ५ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ (POCSO)’ या विषयावरील जनजागृती प्रशिक्षण शिबिर श्री शिवाजी विधी महाविद्यालयात आज संपन्न झाले.बालकांच्या सुरक्षिततेबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात न्यायव्यवस्था, पोलीस, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संजय ए. देशमुख हे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एम. सादराणी अध्यक्षस्थानी होते. तसेच वकील संघाचे अध्यक्ष एस. टी. अडकिने, श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांना पाणी घालून करण्यात आली.
मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती संजय देशमुख म्हणाले की, बालपण हा प्रत्येक मुलाचा जगप्रसिद्ध हक्क आहे. भीती, अत्याचार आणि शोषण नव्हे, तर प्रेम, सन्मान आणि सुरक्षितता हेच त्यांचे खरे वातावरण असले पाहिजे. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा तो घडूच नये यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “नाठाळाचे माथी हाणा कायद्याची काठी” या उक्तीचा अर्थ समजून प्रत्येकाने कायद्याचा आदर केला पाहिजे. गोड बोलून विश्वास संपादन करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला देत त्यांनी “जिथे विश्वास, तिथे विश्वासघाताची शक्यता अधिक असते,” असे सांगितले.
समर्थ रामदासांच्या “अखंड सावधान असावे…” या उक्तीचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी जुडो, कराटे, कुस्ती यांसारख्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा अवलंब करावा, प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी धैर्याने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः मुलींनी स्वतःला कमी समजू नये, संकटसमयी आत्मविश्वासाने प्रतिकार करण्याची मानसिक तयारी ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यायाधीश आर. एम. सादराणी यांनी केले.यावेळी तपास अधिकारी श्री. स्वामी यांनी पॉक्सो प्रकरणांच्या तपासादरम्यान येणाऱ्या अडचणींची माहिती दिली, तर डॉ. किशोर सुरवसे यांनी वैद्यकीय तपासणी प्रक्रियेत येणाऱ्या व्यावहारिक अडचणी आणि त्यावरील उपाय स्पष्ट केले.
सूत्रसंचालन डॉ. एस. डी. जवंजाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. एम. एल. धर्मापुरीकर यांनी केले. या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण म. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.शिबिराला न्यायिक अधिकारी, वकील, सरकारी वकील, पोलीस अधिकारी, डॉक्टर, शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, पत्रकार, विद्यार्थी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री शिवाजी विधी महाविद्यालय व जिल्हा न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.