जळगाव, दि. 5: वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरणगाव (ता. भुसावळ) येथील उपमुख्याध्यापक बी.एम.राठोड हे दिनांक 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झाले.श्री. राठोड हे अत्यंत साधी राहणीमान व उच्च विचारसरणी असलेले, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या सेवाकाळात शिक्षणासाठी स्वतःला पूर्णतः वाहून घेतले होते. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नेहमीच मदत करणारे आणि सर्वांचे लाडके उपमुख्याध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती.
या निमित्ताने आयोजित निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत हरी बडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. वंदना भागवत पाटील उपस्थित होत्या. यावेळी शिक्षक, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, हितचिंतक व मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री. राठोड यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला दीपक जाधव,सुचिता जाधव,देवकी खेडकर तसेच पत्रकार हर्षल खेडकर व मनोहर खेडकर उपस्थित होते. मंत्रालयातून उपसचिव धोत्रे साहेब यांनीही शुभेच्छा पाठवल्या.आपल्या मनोगतात श्री. राठोड यांनी सेवाकाळातील अनुभव सांगताना काही खंतही व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “मी पात्र असूनही उपमुख्याध्यापक पद मला योग्य वेळी मिळाले नाही.” तरीदेखील त्यांनी प्रामाणिकपणे काम करत राहण्यावर भर दिला. शाळेत वेळेपूर्वी येणे आणि शाळा सुटल्यानंतर उशिरा घरी जाणे ही त्यांची कार्यपद्धती होती.
सेवानिवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्रात सक्रिय राहण्याचा मानस व्यक्त करत त्यांनी इंग्रजी विषयाचे वर्ग घेणार असल्याचे सांगितले. सर्व विषयांवर प्रभुत्व असलेल्या अशा शिक्षकांना शासनाने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार द्यावा, असे मत पत्रकार मनोहर खेडकर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला राठोड परिवार, मित्रपरिवार, शिक्षक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी श्री. राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.




