27.6 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home शैक्षणिक ‘ध्येयतरंग ०.४’ अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा उद्या

‘ध्येयतरंग ०.४’ अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा उद्या

0
9

गोंदिया: शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा आणि नव्या दमाच्या शैक्षणिक नेतृत्वाचा गौरव करणारा ‘ध्येयतरंग ०.४’ हा जिल्हास्तरीय सोहळा उद्या, रविवारी (दि. १२ जुलै) गोंदियात रंगणार आहे. ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विभागीय परीक्षेद्वारे नवनियुक्त झालेल्या केंद्रप्रमुखांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे.हा सोहळा मेन ब्रँच स्टेट बँकेजवळील श्री गुरुनानक स्कूल ऑडिटोरियम येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

मान्यवरांची मांदियाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर भूषविणार असून, उद्घाटक म्हणून गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की (IAS) उपस्थित राहणार आहेत. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला (IAS) हे याप्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतील.

विशेष अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती सुरेश हर्षे आणि जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी पवन खंडारे व सुधीर महामुनी यांच्यासह पोलीस, प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज अधिकारी व विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहून गौरवमूर्तींचा उत्साह वाढवणार आहेत.

गुणवत्ता आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘आय एम विनर’ व ‘विनर ऑफ द इयर’ या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. उद्या या चिमुकल्या गरुडांचा जिल्हा पातळीवर जाहीर सत्कार करून त्यांच्या गुणवत्तेला दाद दिली जाईल. याच सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, नुकत्याच विभागीय परीक्षेद्वारे निवड झालेल्या जिल्ह्यातील नवनियुक्त केंद्रप्रमुखांचाही वनविभागाच्या आणि शिक्षण विभागाच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येईल.

नियोजनाची जोरदार तयारी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष सुदाम शेंडगे आणि संस्थापक अध्यक्षा अर्चना शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे. नामवंत शिक्षणतज्ज्ञ व ध्येय प्रकाशन अकॅडमीचे वशिष्ठ खोब्रागडे यांच्यासह संपूर्ण टीम कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त आहे.

शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी पर्व! “विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आणि शिक्षण क्षेत्रात नवी जबाबदारी स्वीकारणाऱ्या केंद्रप्रमुखांचा सन्मान करणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा देणारे हे एक प्रेरणादायी पर्व ठरेल.” — आयोजक, ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र.