28.3 C
Gondiā
Tuesday, July 14, 2026
Home विदर्भ लाखनी शहराच्या ₹34.61 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

लाखनी शहराच्या ₹34.61 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

0
8

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

भंडारा -जिल्ह्यातील लाखनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 (AMRUT 2.0) अभियानांतर्गत लाखनी नगरपंचायतीच्या ₹34.61 कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय दि. 14 जुलै 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून, या निर्णयामुळे लाखनी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

लाखनी शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची गरज आणि नागरिकांना दर्जेदार व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ₹17.30 कोटी, राज्य शासनाकडून ₹15.57 कोटी, तर लाखनी नगरपंचायतीचा ₹1.73 कोटींचा हिस्सा राहणार आहे. अशा प्रकारे एकूण ₹34.61 कोटींच्या निधीतून शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत नवीन इन्टेक वेल, जॅकवेल, कच्च्या पाण्याची जलवाहिनी, 4 MLD क्षमतेचा आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, नवीन पंपिंग यंत्रणा, शुद्ध पाण्याची जलवाहिनी, विविध क्षमतेचे उंच जलकुंभ (ESR), संपूर्ण शहरासाठी नवीन वितरण व्यवस्था, SCADA आधारित स्वयंचलित नियंत्रण प्रणाली, फ्लो मीटर, रस्ते पूर्ववत करणे तसेच इतर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात दाबाने, नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

हा प्रकल्प 12 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाखनी शहरातील पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात मात होणार असून, नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. तसेच भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराला सक्षम, आधुनिक व दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी राज्य शासन, नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून या योजनेला गती दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे लाखनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला असून, या मंजुरीमुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.

याबद्दल आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास विभाग तसेच संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांचे आभार व्यक्त केले असून, हा प्रकल्प दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. लाखनी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण यापुढेही कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.