30.2 C
Gondiā
Monday, July 13, 2026
Home विदर्भ बेरडीपार ग्रामपंचायतीत सावळागोंधळ! राजीनामा देऊनही सदस्यत्व कागदावरच कायम; प्रशासक आणि सचिवावर कारवाईची...

बेरडीपार ग्रामपंचायतीत सावळागोंधळ! राजीनामा देऊनही सदस्यत्व कागदावरच कायम; प्रशासक आणि सचिवावर कारवाईची मागणी

0
19

तिरोडा (गोंदिया)- तिरोडा तालुक्यातील बेरडीपार(काचेवानी) ग्रामपंचायतीमध्ये एक धक्कादायक आणि प्रशासकीय बेजबाबदारपणाचा नमुना समोर आला आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य धनराज नागो पटले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन प्रदीर्घ काळ लोटला असतानाही, प्रशासकीय पातळीवर त्यांचे सदस्यत्व अद्याप कागदावरच कायम ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
​काय आहे नेमके प्रकरण?
बेरडीपार ग्रामपंचायतीचा चालू कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ते फेब्रुवारी २०२६ पर्यंतचा आहे. या कार्यकाळादरम्यान ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले धनराज नागो पटले यांनी काही वैयक्तिक कारणास्तव १५ जुलै २०२५ रोजीच आपल्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा सादर केला होता. मात्र, या राजीनाम्याला प्रदीर्घ काळ पूर्ण होत आला तरीही सध्याच्या प्रशासक सौ. चेतना कोल्हटकर आणि ग्रामसचिव डी. एन. शहारे यांनी यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही केली नाही. त्यांनी धनराज पटले यांचा राजीनामा ना स्वीकारला, ना त्यांचे सदस्यत्व अधिकृतरीत्या रद्द केले.
​राजीनाम्याची अवहेलना आणि दुजाभाव
मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा दिल्यानंतर धनराज पटले हे राजीनामा दिल्या पासून ग्रामपंचायत कार्यालयात गेलेले नाहीत. कागदोपत्री त्यांचे सदस्यत्व अजूनही कायम दाखवले जात असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र प्रशासक व सचिव हे त्यांना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही शासकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रमाचे निमंत्रण देत नाहीत.
​कारवाईची मागणी आणि थेट इशारा
“हा प्रकार म्हणजे लोकशाही संकेत आणि राजीनाम्याची सरळ-सरळ अवहेलना आहे. जर माझे सदस्यत्व कागदावर कायम आहे, तर मला शासकीय कार्यक्रमांपासून का दूर ठेवण्यात आले?” असा रोकड सवाल धनराज पटले यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण सावळागोंधळाला आणि मनमानी कारभाराला जबाबदार असलेल्या प्रशासक सौ. चेतना कोल्हटकर आणि सचिव डी. एन. शहारे यांच्यावर वरिष्ठांनी तात्काळ कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी धनराज पटले यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.