गोंदिया/एकोडी: नजिकत्त्या सहेसपूर येथील शंकरटोली परिसरातील एका खासगी फार्म हाऊसमध्ये (ता. १४) सकाळी बिबट्याचा पिल्लु आढळला. दरम्यान हा पिल्लु बिबट्याने सोडला असावा, असा कयास लावला जात असून वनविभागाने सध्या बिबट्याच्या पिल्लुवर त्याच ठिकाणी निगराणी ठेवली असून कॅमेरे सुध्दा लावले आहेत. या प्रकाराने मात्र परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर असे की, शंकरटोली परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात प्लास्टिक मल्चिंग केलेल्या बांधावर एक प्रौढ मादी बिबट्या फिरत असल्याचे काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यानंतर काही वेळाने, त्याच शेतातील फार्म हाऊसमध्ये ठेवलेल्या पाईप्स आणि इतर शेती साहित्याच्या आडोशाला एक छोटे बिबट्याचे पिल्लू लपून बसलेले आढळले. या पिल्लाचे वय अंदाजे २ ते ३ महिने असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, मादी बिबट्या अनेकदा शिकारीसाठी जाताना आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी लपवून ठेवते, ही घटनाही त्याच प्रकारातील आहे, असे मानले जात आहे. फार्म हाऊसमध्ये पिल्लू दिसताच स्थानिक शेतकऱ्यांनी वन
विभागाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या रेस्क्यू पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मादी बिबट्या आपल्या पिल्लाला शोधत परत येण्याची आणि त्याला घेऊन जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे निसर्गाच्या नियमानुसार पिल्लाला कोणताही मानवी स्पर्श न करता, त्याला त्याच ठिकाणी या सुरक्षित ठेवण्यात आले आहे. वन विभागाने परिसरात मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तात्काळ ‘कॅमेरे लावले आहेत. एंकदरीत या प्रकाराने सहेषपूर, एकोडी, सेजगाव, शंकरटोली, कास्टोला आदि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांची बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी व बिबट आढळलेल्या ठिकाणापासून दूर रहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.





