29.7 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home विदर्भ मजितपूर-गंगाझरी येथे पांदण रस्ता बांधकामात भ्रष्टाचार

मजितपूर-गंगाझरी येथे पांदण रस्ता बांधकामात भ्रष्टाचार

0
7

गोंदिया,दि.१५ःजिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्ते खडीकरणा’ची कामे गेल्या तीन महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सुरू आहेत. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि घोळ असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, गंगाझरी आणि मजितपूर गावात सुरू असलेल्या शेत पांदण रस्त्याच्या बांधकामात कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी व गावकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. नियोजित ठिकाणी रस्ता बांधकाम न करता कंत्राटदाराने मनमर्जीने दुसऱ्याच ठिकाणी रस्ता बांधला आहे. त्यातही पहिल्याच पावसात रस्त्याचे हाल झाले असून लाखो रूपयाचा निधी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. गावकऱ्यांनी या भ्रष्ट कारभाराची तक्रार संबंधित विभागाकडे केली आहे.
गंगाझरी आणि मजितपूर गावात पांदण रस्त्याचे बांधकाम हे मूळ नियोजित ठिकाणी न करता, कंत्राटदार स्वतःच्या सोयीसाठी आणि कमी खर्चात काम उरकण्यासाठी इतर ठिकाणी पांदण रस्त्याचे काम करीत आहे. वास्तविक पाहता, गंगाझरी ग्रामपंचायत अंतर्गत जुवेनानी येथील सुशील टेकाम ते चतरू इनवते यांच्या घरापर्यंत आणि मजितपूर ग्रामपंचायत अंतर्गत नवाटोला ते रेल्वे लाईनपर्यंत पांदण रस्त्याचे मजबुतीकरण करणे अत्यंत आवश्यक व पूर्वनियोजित होते. मात्र, या मूळ मार्गांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कंत्राटदाराने अन्यत्र अयोग्य व निरुपयोगी ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात साहित्य टाकून निकृष्ट दर्जाचे बांधकाम उरकले. पहिल्याच पावसात या रस्त्याची पुरती वाट लागली असून, स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना शेतात ये-जा करताना अतोनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मनमानी प्रकारावर परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून शासन निधीचा अपव्यय करण्यात आल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. या कामाची  उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेच्या या संगनमका मुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकून त्याचे बिल रोखण्यात यावे आणि दोन्ही शेत पांदण मार्ग पुन्हा पूर्वनियोजित ठिकाणीच बांधण्यात यावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमानुसार कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे