28.4 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home विदर्भ घरकूल निधी रखडल्याने लाभार्थ्यांना मानसिक त्रास; खासदारांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

घरकूल निधी रखडल्याने लाभार्थ्यांना मानसिक त्रास; खासदारांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
8

तुमसर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे निधी हस्तांतरण आदेश मंजूर झाल्यानंतरही त्यांच्या बँक खात्यात निधी जमा होण्यास १ ते २ महिन्यांचा मोठा विलंब होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांना मंगळवार रोजी निवेदन देण्यात आले.

तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत परसवाडा (दे.) चे उपसरपंच पवन खवास यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या सात दिवसांत या प्रकरणावर योग्य कारवाई झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सदर माहितीनुसार, घरकुलाचा निधी वेळेत मिळत नसल्यामुळे गरीब लाभार्थ्यांना बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक लाभार्थी कर्ज काढून किंवा उसनवारी करून घराचे बांधकाम कसेबसे सुरू ठेवत आहेत. मात्र, हप्ता वेळेत न मिळाल्यामुळे त्यांच्यावर व्याजाचा अतिरिक्त भार पडत असून त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.

निधी हस्तांतरण आदेश झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात निधी शक्य तितक्या लवकर जमा व्हावा यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. सध्या प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांचा निधी तातडीने वितरित करण्यात यावा. निवेदन देतेवेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र शेंडे आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक लुटे प्रामुख्याने उपस्थित होते. आता यावर जिल्हाधिकारी काय पावले उचलतात, याकडे जिल्ह्यातील घरकूल लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

“निधी हस्तांतरण आदेश झाल्यानंतरही गरिबांच्या घरकुलाचा निधी महिना-दोन महिने रखडणे अत्यंत अन्यायकारक आहे. यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने यावर मार्ग काढून थकीत निधी त्वरित वितरित करावा, अन्यथा आम्हाला जनतेच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल.”
—डॉ. प्रशांत पडोळे, खासदार, भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्र.