31.3 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home विदर्भ वेतन रखडल्याने जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींमधील ७५० कर्मचाऱ्यांचे बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन

वेतन रखडल्याने जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींमधील ७५० कर्मचाऱ्यांचे बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन

0
11

प्रशासकीय अनास्थेमुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ;निधी उपलब्ध असूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिरंगाईचा आरोप

गोंदिया, १६ जुलै :गोंदिया जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध असूनही, प्रशासनाच्या अकार्यक्षम आणि कर्मचारी-विरोधी धोरणांमुळे एप्रिल महिन्यापासून वेतन न मिळालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अखेर अंत झाला आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींमधील सुमारे ७५० कर्मचाऱ्यांनी आज (१६ जुलै) पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांसमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.

राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष कॉम्रेड मिलिंद गणवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव आणि देवरी येथील पंचायत समिती कार्यालयांसमोर आजपासून हे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे.

७ दिवसांचे काम ४ महिने रखडले!

राज्याचा ग्रामविकास विभाग पुणे येथील पंचायत राज प्रशासन कक्षाद्वारे जिल्हा परिषदांना वेतनासाठीचे अनुदान आणि भविष्य निर्वाह निधीची (PF) रक्कम वर्ग करतो. त्यानंतर पंचायत समित्यांच्या माध्यमातून हा निधी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सात दिवसांत पूर्ण होऊ शकते, हे संबंधित विभागानेही मान्य केले आहे. असे असतानाही गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळणे, ही गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराची साक्ष आहे.

आश्वासनांची पायमल्ली; तीव्र आंदोलनाचा इशारा

दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत वेतन मिळावे या मागणीसाठी ११ मे रोजी जिल्हा परिषदेवर एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. मुरुगानंदम यांनी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (ग्रामपंचायत) तशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांची बदली होताच प्रशासनाने पुन्हा या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष केले.ग्रामीण विकासाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या या अल्पवेतनधारक कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. वेतनाची त्वरित अदायगी करावी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कॉम्रेड मिलिंद गनवीर यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

तालुकानिहाय आंदोलनाचे नेतृत्व आणि सहभाग

आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे:

  • गोंदिया पंचायत समिती: येथे ११० ग्रामपंचायतींमधील १६२ कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. याचे नेतृत्व कॉम्रेड मिलिंद गणवीर, जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र कटरे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊलाल कटंगकर, तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम आणि तालुका सचिव विनोद शहारे करत आहेत.

  • सडक-अर्जुनी: जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न लांजेवार, तालुका सचिव विष्णू हत्तीमारे आणि खुशाल बनकर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू आहे.

  • तिरोडा: पंचायत समिती कार्यालयाबाहेर जिल्हा सचिव रवींद्र किटे, तालुकाध्यक्ष लोमेश पारधी आणि सचिव आशिष उरकुडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

  • गोरेगाव: ‘आयटक’चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हौसलाल रहांगडाले, जिल्हा सहसचिव बुधराम बोपचे आणि तालुकाध्यक्ष तुळशी चौधरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

  • अर्जुनी-मोरगाव: तालुकाध्यक्ष ईश्वरदास भंडारी आणि सूरज रामटेके यांच्या नेतृत्वात कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.

  • देवरी: येथे गजेंद्र हिरवाणी आणि मनोज जनबंधू यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत कामबंद पुकारण्यात आले आहे.